मुंबई : पावसाळय़ात मुंबईत पाणी साचू नये यासाठी नालेसफाईची कामे वेगाने सुरू असून शहर भागातील ७५ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे. शहर भागातील नालेसफाईत दिरंगाई झाल्याबद्दल पालिकेने संबंधित कंत्राटदाराला पाच लाखांचा दंड करून त्याच्या जागी दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. नालेसफाईची पूर्ण कामे ३१ मे पर्यंत पूर्ण होतील, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून दरवर्षी नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे केली जातात. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळय़ाआधी काढला जातो. त्याची कामे दरवर्षी १ एप्रिलला सुरू होतात. यंदा मात्र पालिकेची मुदत संपत असताना स्थायी समितीने नालेसफाईचे प्रस्तावच मंजूर केले नव्हते. त्यामुळे प्रशासनाने नंतर आपल्या अधिकारात नालेसफाईच्या प्रस्तावांना मंजुरी दिली व प्रत्यक्षात ११ एप्रिलपासून नालेसफाईची कामे सुरू झाली. ही कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करावी लागणार आहेत. नाल्यांतील ५० टक्के गाळ काढण्यासाठी पालिका आयुक्तांनी १५ मे पर्यंतची मुदत दिली होती. दोन पाळय़ांमध्ये व अतिरिक्त सामुग्री लावून ही कामे पूर्ण करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. मात्र शहर भागातील मोठय़ा नाल्यांतील गाळ काढण्याचे काम कंत्राटदाराला वेळेत पूर्ण करता आले नाही. त्यामुळे या कंत्राटदाराला १० मे रोजी पालिका प्रशासनाने नोटीस दिली होती. व ५० टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्याबाबत ताकीद दिली होती. कामात दिरंगाई केल्याबद्दल या कंत्राटदाराला कंत्राटातील अटीनुसार पाच लाखाचा दंड करण्यात येणार असल्याची माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता अशोक मिस्त्री यांनी दिली.

शहर भागात वरळी, परळ, धारावी, दादर, सायन, माटुंगा परिसरात मोठे नाले आहेत. या भागातील नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागांत पाणी तुंबण्याची भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने पावसाळापूर्व गाळ काढण्याचे २५ टक्के काम करण्यासाठी दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक केली असून दोन कंत्राटदार नेमल्यामुळे शहर भागातील नालेसफाईचा वेग काहीसा वाढला आहे. पावसाळय़ातील एकूण गाळापैकी ७५ टक्के गाळ २४ मे पर्यंत काढण्यात आला आहे. येत्या सहा दिवसात उर्वरित गाळ काढण्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

*  एकूण नालेसफाई-  ९१.१२%

* शहर ७४.३३%

* पूर्व उपनगरे   ८७.१८ %

* पश्चिम उपनगरे       ८३.७४ %

* मिठी नदी    ९३.५९ %

* छोटे नाले    ९७.०४%

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 75 percent drainage cleaning completed in mumbai zws
First published on: 25-05-2022 at 00:10 IST