मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याच्या आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला आठ-दहा आमदारांचा अपवाद वगळता बहुसंख्य आमदारांनी हजेरी लावली. त्यामुळे पक्षाचे सर्व आमदार एकत्र आहेत, विधिमंडळ पक्ष एकसंध असल्याचा दावा प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी १६ व शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी असे दोन दिवस राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला सर्व आजी, माजी आमदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. काही कारणामुळे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या आमदारांना उद्या उपस्थित रहावे लागणार आहे, असे सांगण्यात आले.

हेही वाचा >>> ‘वाढवण’चे याच महिन्यात भूमीपूजन देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, केंद्रीय पर्यावरण खात्याची मंजुरी

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे दूरचित्र प्रणालीच्या माध्यमातून शिबिराचे उद्घाटन करणार असल्याची माहिती देण्यात आली. काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व मुकूल वासनिक शिबिराला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील हालचालींवर दिल्लीचीही नजर असल्याचे मानले जात आहे. शिबिराच्या माध्यमातून सर्व आमदारांना पुन्हा एकत्र बोलावून कोण, कुठे आहे, याचीही चाचपणी करण्याचा प्रयत्न होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रकांत हंडोरे यांचा विजय निश्चित

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत चंद्रकांत हंडोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे अजय चौधरी व काँग्रेस पक्षाचे आमदार उपस्थित होते. चंद्रकांत हंडोरे हे सर्वाधिक मतांनी विजयी होतील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.