मुंबई : आईने मोबाइलवर गेम खेळायला मनाई केल्याच्या कारणास्तव १५ वर्षीय मुलाने धावत्या लोकलसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ८ जून रोजी रात्री ७.४५ च्या सुमारास पश्चिम रेल्वेवरील मालाड आणि कांदिवली स्थानकांदरम्यान धावत्या लोकलसमोर त्याने उडी घेतली.
दिंडोशी येथे राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाला मोबाइलवर गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. या प्रकारामुळे त्याची आई कंटाळली होती. घटनेच्या दिवशी आईने रागाच्या भरात त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला आणि त्याच्यावर ओरडली. त्यामुळे या १५ वर्षीय मुलाचा राग अनावर झाला. त्याने आत्महत्या करण्यासंदर्भात चिठ्ठी लिहून घर सोडले. आई घरी आल्यानंतर तिला मुलाने लिहिलेली चिठ्ठी सापडली. कुटुंबीयांनी आत्महत्येची चिठ्ठी मिळताच दिंडोशी पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली आणि मुलाचा शोध सुरू केला. तेव्हाच पोलिसांना मालाड आणि कांदिवलीदरम्यान मुलाने आत्महत्या केल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शहानिशा केली असता, मृतदेह १५ वर्षीय मुलाचाच असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, अपघाती मृत्यू अशी घटनेची नोंद करण्यात आली आहे.