राज्यातील ८० टक्क्यांपर्यंत शेतकऱ्यांना यंदा बँकांनी पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी बँकर्स समितीने यंदाच्या पीककर्ज आराखडय़ात वाढ करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बँकर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सहकारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना होणाऱ्या कर्जपुरवठय़ाचे प्रमाण अधिक आहे, पण वाणिज्यिक बँकांनीही हे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी बँकर्स समितीने कृती आराखडा तयार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. सकल राज्य उत्पन्नात कृषिक्षेत्राचा वाटा १० ते ११ टक्के आहे. तो वाढविणे आवश्यक असून, गेली चार वर्षे दुष्काळामुळे या क्षेत्राचा विकासदर उणे आहे. तरीही शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची टक्केवारी ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत आहे. यंदा चांगला पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज असून सर्वानी एकत्र येऊन कृषिक्षेत्रासाठी काम केले, तर विकासदर वाढेल. त्यातून राज्य अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले.