बाधितांची वाढती संख्या चिंताजनक

मुंबई : राज्यातील करोनाची साथ नियंत्रणात येत असली तरी म्युकरमायकोसिस हा रोग झपाट्याने पसरत आहे. या रोगाने आतापर्यंत ९० रुग्णांचा बळी गेला असून ५०० रुग्णांनी आजारावर मात केली आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये ८५० रुग्णांवर उपचार सुरू असून तो खर्चीक असल्याने रुग्णांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली.

म्युकरमायकोसिस आजारावरील उपचारासाठी अत्यावश्यक इंजेक्शनची सध्या टंचाई असल्याने केंद्र सरकारने त्वरित वाढीव साठा उपलब्ध करून देण्याची मागणीही टोपे यांनी केली.

सरकारने टाळेबंदीसारखे कठोर निर्बंध लागू केल्याने राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या झपाट्याने खाली येत आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क््यांच्या पुढे गेले असून सक्रिय रुग्णांची संख्याही सात लाखांवरून चार लाखांपर्यंत खाली आली आहे. करोना रुग्णांवरील उपचाराबाबत सरकारकडे प्राणवायू, रेमडेसिविरसह अन्य पुरेशा सुविधा उपलब्ध असून करोना नियंत्रणात येत आहे ही दिलासादायक बाब असली तरी म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) आजार चिंता वाढविणारा असल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यात म्युकरमायकोसिसचे सुमारे १५०० रुग्ण आहेत. या आजारावरील उपचारामध्ये बुरशीविरोधी औषधे हा महत्त्वाचा भाग असून त्याची टंचाई आहे. त्यासाठी एक लाख ९० इंजेक्शन खरेदी करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. मात्र या इंजेक्शनचे नियंत्रण केंद्राने ताब्यात घेतले असून पुढील दहा दिवस इंजेक्शनची तीव्र टंचाई भासणार आहे. त्यामुळे केंद्राने त्वरित ही इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. या इंजेक्शनसाठी जागतिक निविदा काढण्यात आल्या असल्या तरी त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. इंजेक्शनसाठी लागणारा कच्चा माल खरेदी करून वर्धा आणि पालघर येथील कंपन्यांकडून ही इंजेक्शने बनवून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजस्थानात साथरोग जाहीर

जयपूर : राजस्थानने म्युकरमायकोसिसला साथीचा रोग जाहीर केले आहे. तेथे या रोगाचे १०० रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी जयपूरमधील सवाई मानसिंह (एसएमएस) रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

पुणे-विदर्भात वाढते रुग्ण

पुण्यात ‘म्युकरमायकोसिस’च्या ५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर नागपूरमध्ये या आजारामुळे ४३ रुग्णांनी डोळे गमावले आहेत. नागपूर जिल्ह्यात अडीच महिन्यात या आजाराचे सुमारे ६०० रुग्ण आढळले. त्यातील २६ रुग्णांचा मृत्यू झाला, तर साडेपाचशेच्या जवळपास रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात ४३ रुग्णांनी दृष्टी गमावली. चंद्रपूर जिल्ह्यात या आजाराचे ५२ रुग्ण असून त्यापैकी २६ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.