रशियाहून नुकतीच आपल्या पालकांसोबत अंबरनाथ येथे आलेली एक अल्पवयीन मुलगी करोनाबाधित आढळल्याची माहिती समोर आली आहे. या मुलीला ओमायक्रॉन या विषाणूची बाधा झाली आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तत्काळ या मुलीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. 

जिल्हा प्रशासनाकडून परदेशातून आलेल्या नागरीकांची नोंद केली जात आहे. या नोंदणीतून मिळालेल्या माहितीतून अंबरनाथ पूर्व परिसरातील ही अल्पवीयन मुलगी पालकांसह फिरण्यास रशिया येथे गेली होती. रशियाला गेलेले हे कुटुंब परत आल्यानंतर या मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे मुलीची करोना चाचणी केली असता तिला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. तर या मुलीच्या वडिलांची चाचणी निगेटिव्ह आली असून, आईच्या चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अशी माहिती नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ.धीरज चव्हाण यांनी दिली आहे. 

Omicron : मुंबई विमानतळावर आतपर्यंत ८०० जणांची RTPCR चाचणी!

तर, ‘ओमायक्रॉन’बाबत राज्यात पूर्णपणे दखल घेतली जात असून मुंबई विमानतळावर आतापर्यंत ८०० जणांची RTPCR चाचणी घेण्यात आली आहे. यापैकी करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या २८ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.