Narendra Modi Road Show in Mumbai : मुंबईत २० मे रोजी सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे अनेक केंद्रीय मंत्र्यांनी मुंबईत तळ ठोकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल (१५ मे) मुंबईला भेट दिली. कल्याणमध्ये जाहीर सभा घेऊन घाटकोपरमध्ये रोड शो केला. या रोड शोमुळे सर्वसामान्य नागरिकांचं आणि नोकरदारवर्गाचं जनजीवन ठप्प झालं. अचानक मेट्रो मार्गिका बंद केल्याने घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती झाली होती. परिणामी संतप्त झालेल्या नागरिकांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर संताप व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत बुधवारी संध्याकाळी नरेंद्र मोदींचा रोड शो झाल्याने या रोड शोसाठी ‘मेट्रो १’च्या प्रवाशांना वेठीस धरण्यात आले होते. पोलिसांच्या सूचनेनुसार मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरील जागृती नगर स्थानक – घाटकोपर स्थानकांदरम्यानची सेवा सायंकाळी ६ वाजल्यापासून पूर्णत: बंद केली होती. परिणामी कार्यालयातून घरी परतणाऱ्या प्रवाशांना त्याचा प्रचंड फटका बसला.

घाटकोपरमधील चेंगराचेंगरीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

गेल्या काही वर्षांत मेट्रो १ चे प्रवासी वाढले आहेत. सेंट्रल रेल्वे स्थानकातून पश्चिम उपनगरात जाण्याकरता मेट्रो ही सुलभ पर्यायी व्यवस्था आहे. त्यामुळे मेट्रो मार्गावरून नियमित लाखो प्रवासी प्रवास करतात. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित रोड शोसाठी मेट्रो १ ची वाहतूक अंशतः बंद करण्यात आली होती. कार्यालयीन वेळा सुटण्याच्या कालावधीतच हा रोड शो असल्याने कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमन्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. घाटकोपर रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी जमली होती. मेट्रो १ बंद केल्याने घाटकोपर स्थानकावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यासंदर्भातील व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्रचारासाठी सर्वसामान्यांना वेठीस का धरण्यात येत आहे, असा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यापूर्वी २०२३ मध्ये ‘मेट्रो २ अ’ (दहिसर – अंधेरी पश्चिम) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर – गुंदवली) मार्गिकांच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने ‘मेट्रो १’ची सेवा बंद करण्यात आली होती.

हेही वाचा >> VIDEO : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, बचावकार्यात अडचणींचा डोंगर!

महाराष्ट्र दौऱ्यात नरेंद्र मोदी कुठे कुठे गेले?

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक आणि कल्याण येथे सभा घेतल्या. तसेच मुंबईत त्यांनी घाटकोपर परिसरात ‘रोड शो’द्वारे शक्तिप्रदर्शनही केले. नाशिक आणि कल्याण या दोन्ही ठिकाणी झालेल्या सभांमध्ये मोदींनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A stampede like situation at ghatkopar railway station due to narendra modis road show in mumbai video sgk