मध्य रेल्वेवरील बहुप्रलंबित आणि बहुचर्चित अशा डीसी-एसी परिवर्तनाला अखेर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हिरवा कंदील दिला असून आता ६-७ जूनच्या मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवरील ठाणे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस हा उर्वरित मार्ग एसी विद्युतप्रवाहावर चालणार आहे. यामुळे रेल्वेच्या विजेची बचत होणार असली, तरी सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा त्वरित फायदा काहीच होणार नाही. दरम्यान रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सीएसटी ते कुर्ला या स्थानकांदरम्यान नऊ ठिकाणी किमान १५ किमी ते कमाल ५० किमी प्रतितासाची वेगमर्यादा घातली आहे.
रेल्वे प्रवासी व ग्राहक सुविधा पंधरवडय़ातच डीसी-एसी परिवर्तन व्हावे, असा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांचा आग्रह होता. त्यानुसार आधी २३ मे ही ठरवलेली तारीख २६ व ३० मेपर्यंत वाढवण्यात आली. मात्र रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी या प्रकल्पाची पाहणी करण्याची मागणी केल्यामुळे डीसी-एसी परिवर्तनाचे काम रखडले होते. मध्य रेल्वेने दिलेल्या रात्रकालीन विशेष ब्लॉकदरम्यान रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी चार दिवस पाहणी करून आता या परिवर्तनाला हिरवा कंदील दिला आहे. मात्र नऊ ठिकाणी पुलांच्या उंचीमुळे वेगमर्यादा घातली आहे.
आता मध्य रेल्वे शनिवारी ६ जूनच्या मध्यरात्री शेवटची गाडी गेल्यावर आणि ७ जूनला पहिली गाडी सुरू होईपर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुंब्रा या धीम्या मार्गावर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड या जलद मार्गावर विशेष ब्लॉक घेणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी दिली.  वेगमर्यादेनुसार पावसाळ्यादरम्यान गाडय़ांना ३० किलोमीटर प्रतितास आणि इतर वेळी ५० किमी प्रतितास या वेगात गाडय़ा चालतील. सीमेन्स कंपनीच्या गाडय़ांसाठी मात्र ही वेगमर्यादा वर्षभर १५ किलोमीटर प्रतितास एवढी असेल.