‘एमआरव्हीसी’कडून नियोजन सुरू; ‘आरडीएसओ’कडून एसी लोकलबाबत सूचना घेण्यास सुरुवात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून मुंबईकरांच्या सेवेत ४७ वातानुकूलित लोकल येत्या काही वर्षांत दाखल केल्या जातील. या लोकल कशा प्रकारे असाव्यात, त्यात कोणत्या सुविधा देण्यात आल्या पाहिजे, इत्यादीवर विचारविनिमय करतानाच नियोजनही केले जात आहे. सध्याच्या धावणाऱ्या साध्या लोकलमधील मालडबा आणि अपंग डब्यांपेक्षा दाखल होणाऱ्या एसी लोकलमध्ये या डब्यांची संख्या कमी ठेवण्याचा विचार असल्याची माहिती एमआरव्हीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे एसी लोकल असल्याने या लोकलला मालडबा असावा की नाही हादेखील विषय एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चेला आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर यापुढे बहुतांश एसी लोकल चालवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यानुसार एमआरव्हीसीअंतर्गत (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयूटीपी- ३ अंतर्गत मुंबईत ४७ एसी लोकल दाखल करण्याचे नियोजन आहे. या संदर्भात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही काही महिन्यांपूर्वी चर्चा झाली. या चर्चेत जास्तीत जास्त एसी लोकल चालवण्यावरही एकमत झाले होते. येणाऱ्या एसी लोकल या बारा डब्यांच्या असतील, तर या लोकलच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी टॉक बॅक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे असतील. एसी लोकलचे डबे हे मुंबईत धावणाऱ्या मेट्रोसारखेच असतील.

परंतु लोकल दाखल करण्याचे नियोजन जरी केले जात असले तरी बारा डब्यांच्या एसी लोकलमध्ये माल डबा असावा की नाही, तसेच अपंग डब्यांची संख्या किती असावी यावर चर्चा केली जात आहे. सध्याच्या धावणाऱ्या साध्या बारा डबा लोकलमध्ये चार छोटे माल डबे, तर दोन अपंग डबे आहेत. त्यामुळे सध्याच्या लोकलमधील माल डब्यांतून मोठय़ा प्रमाणात मालाची वाहतूक करणाऱ्या फळ, भाजी, मासळी विक्रेत्यांची आणि अपंग डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच सोय होते. एसी लोकलमध्ये सुरुवातीला आणि शेवटाला माल डबा तर या लोकलच्या सुरुवातीलाच एकच अपंग डबा ठेवण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र माल डबे ठेवल्यास ते एसी असावे की नॉन एसी आणि एसी असला तर डब्यातून विक्रेत्यांनी मासळी नेल्यास त्याचा अन्य प्रवाशांना मनस्ताप होऊ शकतो. हे पाहता माल डबा न ठेवण्यावरही विचार केला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अपंग डबा एकच ठेवला तर त्या प्रवाशांचीही गैरसोय होऊ शकते.

सध्या मुंबईत एक एसी लोकल दाखल झालेली आहे. मात्र ती मेट्रो प्रकारातील नाही. या लोकलमध्ये माल डबाही नाही. त्यामुळे ही लोकल दाखल झाल्यास माल वाहतूक करणाऱ्यांना यात स्थान नसेल.

रेल्वेची आरडीएसओ (रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टँण्डर्ड ऑर्गनायझेशन) एसी लोकलची बांधणी करणाऱ्या संबंधित कंपन्या तसेच मध्य, पश्चिम रेल्वेकडून सूचना प्राप्त करीत आहे. या महिन्याअखेपर्यंत सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याचा अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर ही लोकल बांधण्यासाठीची निविदा काढली जाईल. डिसेंबपर्यंत निविदा काढून ती पुढील वर्षांच्या जून महिन्याच्या आत अंतिम केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

एका लोकलची किंमत ७० ते ७५ कोटी रुपये

मुंबईत दाखल झालेल्या एसी लोकलची किंमत ही ५४ कोटी रुपये आहे. तर पुढील काही वर्षांत दाखल केल्या जाणाऱ्या ४७ एसी लोकलपैकी प्रत्येक एसी लोकलची किंमत ही ७० ते ७५ कोटी रुपये असेल. त्यानुसार प्रत्येक डबा हा सहा ते साडेसहा कोटी रुपयांचा आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ac local train in mumbai
First published on: 07-09-2017 at 02:24 IST