मध्य रेल्वे, रेल्वे जमीन विकास प्राधिकरणामार्फत कामे

मुंबई : सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाला गती मिळण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाचे काम मध्य रेल्वे, रेल्वे जमीन विकास प्राधिकरणामार्फत (आरएलडीए, रेल्वे लॅण्ड डेव्हलमेण्ट अ‍ॅथोरिटी) करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. हा प्रकल्प आता ‘हायब्रीड बिल्ड ऑपरेट अ‍ॅण्ड ट्रान्सफर’ तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.  रेल्वे ४० टक्के, खासगी क्षेत्रातून ६० टक्के गुंतवणूक यात असणार आहे. याआधी पुनर्विकास प्रकल्प ‘सार्वजनिक, खासगी भागीदारी’ तत्त्वावर होणार होता. याशिवाय प्रकल्पात काही बदल करण्यात आले असून त्यामुळे प्रकल्पाचा खर्चही कमी करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली.

मुंबईतील ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा (सीएसएमटी) पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय असणाऱ्या सीएसएमटीच्या इमारतीचा पुनर्विकास हा आयआरएसडीसीकडून करण्यात येणार होता. सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी निविदाही काढण्यात आली होती. निविदा प्रक्रियेत अनेक बडय़ा कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यासाठी प्रक्रिया सुरू असतानाच रेल्वे मंडळाने नोव्हेंबर २०२१ च्या पहिल्या आठवडय़ात नवीन धोरणानुसार आयआरएसडीसी बंद करून ते रेल्वे लॅण्ड डेव्हलपमेंट ?ऑथॉरिटीमध्ये (आरएलडीए) विलीन करण्याचा निर्णय घेतला. तसेच संबंधित क्षेत्रीय रेल्वेलाही पुनर्विकासाचे काम देण्यात आले. परंतु क्षेत्रीय रेल्वेला काही मर्यादा आहेत आणि त्यांच्याकडून कामे वेळेत होत नसल्यानेच आयआरएसडीसीकडे काम दिले होते. पुन्हा ही कामे क्षेत्रीय रेल्वे आणि आरएलडीएकडे पुन्हा आली. सीएसएमटीचा विकास कोण व कसा करणार असा प्रश्न असतानाच त्याचे काम आरएलडीए पाहणार असल्याचे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी स्पष्ट केले.

पुनर्विकास ‘सार्वजनिक, खासगी’ भागिदारीतून करण्यात येणार होता. यात एकाच कंपनीची निवड केली जाणार होती. परंतु ते रद्द करण्यात आले असून आता हायब्रीड बील्ड अॉपरेट पद्धत अवलंबली जाणार आहे. त्याला रेल्वे मंत्रालय, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून तत्त्वत: मंजुरी मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये रेल्वेची ४० टक्के आणि खासगी क्षेत्राची ६० टक्के गुंतवणूक असेल. यामुळे प्रकल्प खर्चही १,६०० कोटी रुपयांवरून १,३५० कोटी झाला आहे. 

पुनर्विकासात नेमके काय?

  • सीएसएमटी स्थानकातील सोयीसुविधांमध्ये वाढ करून त्या अधिक कार्यक्षम बनविणे.
  • या स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये आगमन आणि निर्गमनचे वेगळे विभाग करणे,  दिव्यांगाच्या वापरायोग्य स्थानकांमध्ये सुविधा करणे, प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध करून देणे, ऊर्जा बचत करणाऱ्या पर्यायांचा अवलंब करणे.

ल्ल स्थानक हद्दीत रेल मॉलही उभारण्याची संकल्पना स्थानकाच्या हद्दीमध्ये दुकाने, खाण्या पिण्यासाठीची ठिकाणे, मनोरंजनाची साधने आणि इतर गोष्टींचाही समावेश करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांमध्येच रोजच्या गरजेच्या वस्तू मिळाल्यास प्रवाशांना शहरातील अन्य भागातील प्रवास टाळता येईल अशी यामागील कल्पना असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी भारतीय रेल्वे स्थानक विकास प्राधिकरणाकडून सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्त्वावर निविदा मागवण्यात आल्या आहेत.