राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभारावर टीका करताना मुंबईतील सभेत नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप होणाऱ्या राष्ट्रवादीचे नाव घेण्याचे टाळले होते. गुजरात दंगलीवरून न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत राष्ट्रवादीने मोदी यांना क्लिनचिट दिल्याने पवार आणि मोदी दोघेही परस्परांच्या विरोधात सावध भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होते. मोदी हे काँग्रेसचे मुख्य स्पर्धक असल्यानेच त्यांचे अप्रत्यक्षपणे समर्थन करून पवार काँग्रेसवर शरसंधन करीत आहेत.
नरेंद्र मोदी यांचे प्रफुल्ल पटेल यांनी गेल्या आठवडय़ात समर्थन केल्याने त्याची राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असतानाच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पटेल यांची री ओढली आणि गुजरात दंगलीवरून न्यायालयाने मोदी यांना दोषमुक्त केले असल्यास हा विषय आता संपविला पाहिजे, अशी भूमिका मांडली. एकूणच मोदी यांच्याबाबत राष्ट्रवादी मवाळ असल्याचा संदेश गेला आहे. मोदी यांच्याबाबत सौम्य भूमिका घेतानाच भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण पवार यांनी केले आहे.
काँग्रेस आणि मोदी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दररोज परस्परांच्या विरोधात आरोपांची राळ उठत आहे. काँग्रेसने मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला असतानाच पवार यांनी मात्र मोदी यांच्याबाबत मवाळ भूमिका घ्यावी यातच सारे काही आले, अशीच प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात आहे. महाराष्ट्रातील जागावाटपावरून काँग्रेसने कोंडी केल्याने राष्ट्रवादीचे नेते सध्या अस्वस्थ आहेत. काँग्रेसला सूचक इशारा देण्याकरिताच राष्ट्रवादीने मोदीनामा सुरू केला असण्याची शक्यता आहे.
मोदी यांनी मुंबईतील जाहीर सभेत राज्यातील आघाडी सरकारवर आरोप करताना फक्त काँग्रेसचा उल्लेख केला होता. गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आदी राज्यातील नेतेमंडळी काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला लक्ष्य करीत असताना मोदी यांनी जाणिवपूर्वक राष्ट्रवादीचा उल्लेख टाळला होता. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर जास्त आरोप झाले आहेत. तरीही मोदी यांनी राष्ट्रवादीचे नाव घेण्याचे टाळले होते. भविष्यातील राजकीय गणिते लक्षात घेताच मोदी यांनी सावध भूमिका घेतली असावी. कारण सत्ता स्थापण्यासाठी २७२चा जादुई आकडा गाठण्याकरिता सारे पर्याय भाजपलाही खुले ठेवावे लागणार आहेत.
राष्ट्रवादीत संभ्रम
पक्षाच्या स्थापनेपासून अल्पसंख्याक समाजाचे मोठय़ा प्रमाणावर समर्थन राष्ट्रवादीला लाभलेले नाही. अल्पसंख्याक समाजाला खुश करण्याकरिताच राज्यात मुस्लिमांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची सूचना शरद पवार यांनी राज्यातील नेत्यांना केली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा निदान निर्णय तरी व्हावा, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. मुंब्य्रातून निवडून आलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी इशरत जहॉ चकमक प्रकरण लावून धरले. आव्हाड यांच्या भाषणांमध्ये कायम मोदी विरोध ठळकपणे असतो. पवार यांनीच मोदी यांच्याबाबत काहीशी सौम्य भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीतच गोंधळाचे वातावरण आहे. अर्थात, मोदी प्रकरणात पक्षाचे नुकसान होत असल्याचा अंदाज आल्यास पक्षाकडून प्रचाराच्या काळात भूमिका बदलली जाऊ शकते.