scorecardresearch

५७३९ रिक्षांवर मीटर जप्तीची टांगती तलवार

मुंबई उपनगरांतील रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा

संग्रहित छायाचित्र
बिल्ला व परवाना सोबत न बाळगणाऱ्या मुंबई उपनगरातील मुजोर रिक्षा चालकांवर आता मीटर जप्तीची कारवाई परिवहन विभागाकडून (आरटीओ) केली जाणार आहे. त्यानुसार ६९५ रिक्षांचे मीटर जप्त केले असून आणखी ५ हजार ७३९ रिक्षांवर या कारवाईची टांगती तलवार आहे.

जादा भाडे आकारणीबाबत जाब विचारल्यामुळे प्रवाशाला वांद्रे पूर्व येथे एका रिक्षाचालकाने बेदम मारहाण केली होती. त्यानंतर २६ फेब्रुवारीपासून मुजोर रिक्षाचालकांविरोधात आरटीओने जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे. भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे याचबरोबर बिल्ला व परवाना न बाळगणे याकरिता आरटीओंच्या पथकांद्वारे चालकांवर कारवाई केली जात आहे. वांद्रे पूर्व व पश्चिम, कुर्ला, मुंबई विमानतळ, वांद्रे, घाटकोपर, भांडूप, मुलुंड यासह अन्य काही भागांत आठ हजाराहून अधिक प्रकरणांमध्ये पथकाने मोठय़ा प्रमाणात कारवाई केली आहे.

चालकाने रिक्षा चालवताना बिल्ला व परवाना सोबत न बाळगल्याची बरीच प्रकरणे आहेत. अशा चालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी बिल्ला व परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाते. मात्र निलंबन करूनही चालक रिक्षा चालवतो. अशी प्रकरणेही समोर येत असल्याने अखेर अशा चालकांच्या रिक्षांचे मीटरच काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  मीटरविना रिक्षा चालविल्यास पुन्हा कारवाईचा बडगा उचलला जाऊ शकतो.

३६५० जणांना नोटिसा

उपनगरात आतापर्यंत ६ हजार ४३४ प्रकरणांमध्ये चालकांकडे बॅज वा लायसन्स नव्हते. यातील ६९५ रिक्षाचालकांच्या लायसन्स व बॅज, परवाना निलंबनाची कारवाई केली आहे. त्या रिक्षा पुन्हा रस्त्यावर उतरू  नयेत यासाठी मीटरही काढले आहे. याशिवाय ३ हजार ६५० जणांना नोटीस पाठवण्यात आली असून उर्वरित चालकांनाही नोटीस पाठवण्याचे काम सुरू असल्याचे आरटीओतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Action against the rickshaw operators in the mumbai suburbs abn

ताज्या बातम्या