स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश

मुंबई : प्राणवायूच्या तुटवडय़ाचा प्रश्न निकालात काढण्यासाठी मुंबई महापालिकेने १२०० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कंत्राटदाराने केवळ ३०० यंत्रपुरवठय़ाची तयारी दर्शविली आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद स्थायी समिती बैठकीत उमटले. अखेर ठरलेल्या दरातच पुरवठादाराने ही यंत्रे पुरवावी अन्यथा त्याच्याविरोधात कठोर कारवाई करावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

मुंबईमध्ये प्राणवायुचा तुटवडा निर्माण होऊन करोनाबाधित रुग्णांवर बाका प्रसंग ओढवू नये यासाठी पालिकेने ऑक्सिनज कॉन्सेन्ट्रेटर यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. प्रत्येकी ८९ हजार ५६० रुपये दराने तीन वर्षांची हमी, दोन वर्षांच्या देखभालीसह १२०० यंत्र पुरविण्याची तयारी कंत्राटदाराने दर्शविली होती. त्यामुळे पालिकेने कंत्राटदाराबरोबर करारही केला. पालिकेने १२०० यंत्र खरेदीची तयारी दर्शविलेली असताना कंत्राटदाराने केवळ ३०० यंत्रे देण्याची तयारी दर्शविल्याची बाब सदस्यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिली. नियमानुसार कंत्राटदाराने १२०० यंत्र पुरविणे बंधनकारक आहे. अन्यथा पुरवठादार कराराला बगल देत मनमानी कारभार करीत असेल तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. निविदा प्रक्रियेतील एका कंत्राटदाराने सादर केलेल्या कागदपत्रांमधील छपाईतील चुकीवर बोट ठेवून अधिकाऱ्याने त्याला बाद ठरविले. हा प्रकार संशयास्पद असून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, असेही स्थायी समिती अध्यक्षांनी स्पष्ट केले.