सुरक्षिततेची बाब म्हणून मुंबई महापालिकेने दादरच्या केशवसूत पुलाखालील दुकाने हटविण्याच्या कारवाईस सोमवारी सुरुवात केली. प्रशासनाने सोमवारी पुलाखालील पालिकेच्या तीन चौक्या हटवून या कारवाईस सुरुवात केली. लवकरच इतर दुकानेही हटविण्यात येणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने सुरक्षिततेची बाब म्हणून पुलांखालील दुकाने आणि वाहनतळे तात्काळ अन्यत्र हलविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने दादरमधील केशवसूत पुलाखालील दुकाने हलविण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या जी-उत्तर विभागाने केशवसूत पुलाखालील दुकानांवर नोटीसही बजावल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात सोमवारी कारवाईला सुरुवात करण्यात आली. पालिकेने गुरुवारी पुलाखालील आपल्या तीन चौक्या येथून हटविल्या आहेत. पुलाखालील दुकानांची जागा १५ दिवसांमध्ये रिकामी करण्याचे आदेश दुकानदारांना देण्यात आले आहे. त्यानंतर ही दुकानेही तेथून हटविण्यात येणार आहेत. याच पुलाखाली अवनी ट्रस्टचे उपाहारगृह असून तेही हटविण्यात येणार आहे.दरम्यान, या पुलाखाली असलेल्या अधिकृत दुकानदारांना पर्यायी जागा देण्याचा विचार पालिका करत आहे.