अन्न आणि औषध प्रशासनमंत्र्यांची घोषणा

मुंबई : वजन कमी-अधिक करण्यासाठी, तसेच शरीरसौष्ठवासाठी उत्तेजके (स्टेरॉईड) देणाऱ्या व्यायामशाळांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी राज्यभर मोहीम राबविली जाईल. तसेच अशा औषधावर निर्बंध आणण्याबाबत कायदा करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बुधवारी विधानसभेत केली.

अमित साटम, आशीष शेलार, कॅप्टन आर. तमिल सेल्वन आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक मिळविण्याच्या ईर्षेपोटी वजन कमी करण्यासाठी गोळ्या घेतल्याने ठाण्यातील एका युवतीचा मृत्यू झाला. तर आणखी एका घटनेत उत्तेजकांच्या सेवनामुळे शरीरसौष्ठवपटूचा मृत्यू झाल्याची माहिती देत वजन कमी करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी व्यायामशाळांमध्ये देण्यात उत्तेजकांवर बंदी आणण्याची मागणी सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी केली.

अमेरिकेतून उत्तेजकयुक्त पावडर मोठय़ा प्रमाणात राज्यात येत असून व्यायामशाळेत जाणारा तरुण वर्ग त्याचे सेवनही करीत आहे. त्यामुळे तरुण पिढीचे मोठे नुकसान होत असून या औषधांवर बंदी घाला तसेच याबाबत कठोर कायदा करण्याची मागणी सदस्यांनी केली.

‘औषधावर बंदी घालण्याचे अधिकार केंद्राला’

कोणत्याही औषधावर बंदी घालण्याचे अधिकार केंद्र सरकारला असून दमा, त्वचेवरील आजार तसेच अन्य आजारांवरील उपचारांसाठी उत्तेजकांच्या प्रवर्गातील औषधे आवश्यक असल्याची माहिती डॉ. शिंगणे यांनी दिली. व्यायामशाळेमध्ये अशा औषधांचा चुकीच्या कारणांसाठी वापर केला जात असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.