दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर मुंबई वाहतुक पोलिसांनी शहरातील काळ्या कांचा असलेल्या वाहनांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. यासाठी पोलिसांनी आता रस्त्यावरच्या वाहनांव्यतिरीक्त पार्किंगमधल्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत पार्किंगमधल्या दिड हजार वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिरीक्त पोलीस आयुक्त ब्रिजेश सिंग यांनी दिली.
वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांवरील काळ्या काचांवर कारवाई सुरू केली होती. सुरुवातील या मोहिमेत दिवसाला केवळ १५ ते २० वाहनांवर कारवाई व्हायची. मात्र दिल्लीतील चालत्या बसमधील सामुदायिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर काळ्या काचांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आधी सुरु असलेली काळ्या काचांवरील कारवाई आता अधिक जोमाने राबवण्याचे वाहतूक पोलिसांनी मनावर घेतले आहे. केवळ दोनच दिवसांत शहराच्या विविध भागांत पार्किंगमध्येच  काळ्या काचा असलेली सुमारे दिड हजार वाहने दोन दिवसात आढळून आली. यापुढे ही कारवाई अधिक जोमाने राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.