आर्यनच्या मोबाइलमध्ये संशयित संभाषण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: अभिनेत्री अनन्या पांडेची गुरुवारी अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) कार्यालयात चौकशी करण्यात आली. सव्वादोन तासांच्या चौकशीनंतर तिला पुन्हा शुक्रवारी सकाळी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले. त्यापूर्वी एसीबीने तिला चौकशीसाठी समन्स बजावले होते. क्रुझ पार्टीप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या मोबाइलमध्ये एनसीबीला संशयित संभाषण सापडले होते. त्याबाबत अनन्याला प्रश्न विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

एनसीबीने अनन्याच्या वास्तव्याच्या ठिकाणांवर शोध मोहीम राबवून एक लॅपटॉप ताब्यात घेतला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी दोन वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले होते. अनन्या दुपारी चारच्या सुमारास एनसीबी कार्यालयात दाखल झाली. यावेळी तिचे वडील चंकी पांडेही उपस्थित होते. समीर वानखेडे,व्ही. व्ही. सिंग आणि महिला अधिकाऱ्याच्या उपस्थित अनन्याची चौकशी करण्यात आली. यावेळी आर्यन, तसेच त्याच्या अमली पदार्थ सेवनाबद्दल काही माहिती विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पण सूर्यास्तानंतर महिलांशी चौकशी करता येत नसल्यामुळे अनन्याला सायंकाळी घरी जाण्यास सांगण्यात आले. तिला शुक्रवारी सकाळी ११ वाजता पुन्हा चौकशीला बोलावण्यात आले आहे.

वानखेडे यांच्या परदेशवारीबाबतच्या  आरोपांना ‘एनसीबी’चे उत्तर

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर एनसीबीकडूनही उत्तर देण्यात आले आहे. त्यात उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, वानखेडे यांची एनसीबीमध्ये नियुक्ती झाल्यापासून ते फक्त एकदाच, २७ जुलै, २०२१ ला कुटुंबीयांसोबत मालदीवला गेले होते. त्याबाबत त्यांनी रीतसर परवानगी घेतली होती. दरम्यान, वानखेडे यांच्या दुबईवारीचा आरोप फेटाळून एनसीबीने ३१ऑगस्ट रोजी वानखेडे दुबईला गेले नसल्याचे स्पष्ट केले.

माझ्यावरील आरोप चुकीचे : वानखेडे

अमली पदार्थ विरोधात कारवाई करतो म्हणून तुरुंगात टाकणार असतील, तर काय बोलणार, असा शब्दांत वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिले. मी जर परदेशात होतो, तर माहिती द्या. मी दुबईला होतो, असा अपप्रचार करण्यात येत आहे. त्या दिवशी मी मुंबईतच होतो, मी मालदीवलाही परवानगी घेऊन गेलो होतो, असे वानखेडे यांनी सांगितले. मालदीवला कोणत्याही विशेष व्यक्तींना भेटलो नसल्याचेही यावेळी वानखेडे यांनी सांगितले. मलिक यांच्या आरोपांबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचे वानखेडे यांनी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress ananya pandey interrogated suspicious conversation in aryan khan mobile ncb akp
First published on: 22-10-2021 at 01:03 IST