scorecardresearch

Uddhav Thackeray Live: या शब्दांत आदित्य ठाकरेंनी केलं उद्धव ठाकरेंचं कौतुक

शिवसेनेचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे.

मागील महिनाभरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन सभा घेतल्या आहेत. या सभांमधून त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला झोडून काढलं आहे. या तिन्ही सभांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज शिवसेनेनं मुंबईतील बीकेसी येथे जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची अशाप्रकारची ही पहिलीच सभा आहे. या सभेत शिवसेनेचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे.

त्यांनी कौतुक करताना आपण शिवसैनिक, युवा नेता किवा पक्षाचा पदाधिकारी नाही, तर भारताचा एक नागरिक म्हणून कौतुक करत असल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंचं कौतुक करताना त्यांनी म्हटलं की, करोना काळात महाविकास आघाडी सरकारने हळुहळू निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज फेसबूक लाईव्ह येऊन किंवा ट्विव्हीच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित करायचे. आज काय बंद, काय चालू असणार याची माहिती द्यायचे.

त्यांचा हा कार्यक्रम पाहून लोकांना आधार वाटायचा. कुणीतरी फेसबूक लाईव्ह घेऊन दमदाटी करतोय असं त्यांना वाटत नव्हतं. तर आपल्याच घरातील कुणी वडिलधारी व्यक्ती करोना संसर्गापासून काळजी कशी घ्यायची, हे सांगत असल्यासारखं वाटत होतं. मुख्यमंत्री असावा तर असा. १९९० नंतर अनेक वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा असं आपल्याला वाटत होतं. पण नियतीचा खेळ बघा, जेव्हा जगावर करोना विषाणूसारखं संकट आलं तेव्हाच राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते.

करोनाच्या लढ्यात मुख्यमंत्र्यांनी अनेक कामं केली आहेत. करोना विषाणूशी लढा कसा द्यायचा, याचं मार्गदर्शनं महाराष्ट्रानं देशाला केलं. धारावीचा करोना मॉडेल काम कसं करत आहे, हे जाणून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची टीम इकडे आले, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना माहिती देण्यासाठी धारावीत गेले होते. कामगिरीच्या बाबतीत आपले मुख्यमंत्री मागील दोन वर्षांपासून सलग पहिल्या क्रमांकावर आहेत. करोनाच्या काळात आम्ही सर्वत्र फिरलो, गर्दी व्हायची. पण रुग्णालये बांधण्यासाठी इतर वैद्यकीय गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला जावं लागायचं. देशात करोना संकट आलं असलं तरी, महाराष्ट्रातील शाश्वत विकासाची कामं थांबली नाहीत. मेट्रोची कामं थांबली नाहीत. राज्यावर संकट आल्यावर मुख्यमंत्री डोळे झाकून बसले नाहीत, तर संवेदनशील नेतृत्व काय असतं, देशाला दाखवून दिलं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारला बळ कसं द्यायचं, याचा विचार आपण करायला हवा. मी ३१ वर्षांचा युवा म्हणून मला विचारायचं आहे की देशात जिथे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, महागाई, बेरोजगारी, जातीय तेढ असे प्रश्न आहेत. अशा वेळी तुम्ही कोणतं सरकार निवडणार आहे? घर पेटवणारं की चूल पेटवणारं?

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aditya thackeray praise maharashtra cm udhhav thackeray covid pandemic dharavi corona model rmm

ताज्या बातम्या