धारावी, शीव ते कुलाब्यापर्यंत पसरलेल्या मुंबई शहर जिल्ह्य़ात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि मनसे निवडणूक लढणार की नाही याचीच जास्त उत्सुकता आहे. भाजप आणि शिवसेनेत जागांची अदलाबदल हा किचकट विषय असून, काँग्रेस पक्ष गतवेळचे यश टिकवून ठेवण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.

मुंबई शहरात विधानसभेचे एकूण ३६ मतदारसंघ आहेत; पण मुंबई शहर जिल्ह्य़ात १०, तर उपनगर जिल्ह्य़ात २६ अशी एकूण ३६ मतदारसंघांची विभागणी होते. मुंबई शहर जिल्ह्य़ातील १० पैकी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी तीन, तर एमआयएमचा एक आमदार गेल्या वेळी निवडून आला होता. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते तेव्हा या जिल्ह्य़ात भाजप आणि शिवसेनेला साधारणपणे समसमानच यश मिळाले होते. गेल्या मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या मुंबई शहर जिल्ह्य़ातील दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेना युतीला चांगले यश मिळाले. दहापैकी धारावी, भायखळा आणि मुंबादेवी या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवारांना आघाडी मिळाली होती. आघाडीसाठी एवढाच दिलासा आहे.

मनसे कोणती भूमिका घेते याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. दादरचा समावेश होणाऱ्या माहिम, शिवडी, वरळी मतदारसंघांची समीकरणे मनसेमुळे बदलू शकतात. २००९ मध्ये माहिम आणि शिवडी मतदारसंघ मनसेने जिंकले होते. मनसे लढल्यास शिवसेनेच्या उमेदवारांच्या मराठी मतांवर परिणाम होऊ शकतो.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविणार का, याचीच सध्या मुंबईत चर्चा आहे. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांची तयारी झाली आहे. राजकीयदृष्टय़ा त्रासदायक ठरू शकणारे राष्ट्रवादीचे मुंबईचे माजी अध्यक्ष सचिन अहिर यांच्या हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेने आदित्य यांच्या मार्गात अडथळा येणार नाही या दृष्टीने नियोजन केले आहे.

कुलाबा मतदारसंघाचे विद्यामान आमदार राज पुरोहित यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधातील पुरोहित यांची ध्वनिफीत गाजली होती. तेव्हापासून पुरोहित हे भाजपच्या वर्तुळात काहीसे मागे पडले. मंत्रिपदाची त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. भाजपमध्ये अनेक जण या मतदारसंघात इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांनी तयारी केली आहे.

मुंबादेवी मतदारसंघात काँग्रेसचे अमिन पटेल हे विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुस्लीमबहुल मतदारसंघात एमआयएम किती मतांचे विभाजन करतो यावर पटेल यांचे भवितव्य अवलंबून असेल. भाजप-शिवसेना युती या मतदारसंघात प्रभावी उमेदवाराच्या शोधात आहे.

मलबार हिल या उच्चभ्रू वस्ती असलेल्या मतदारसंघात मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे पुन्हा बाजी मारतील अशीच चिन्हे आहेत. १९९५ पासून लोढा हे सातत्याने या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असून, काँग्रेसचा निभाव लागणे कठीण जाते.

भायखळा मतदारसंघात गेल्या वेळी एमआयएमचे वारिस पठाण हे विजयी झाले होते. या वेळी पठाण यांच्यासमोर कडवे आव्हान असेल. शिवसेनेत प्रवेश केल्यावर सचिन अहिर यांनी या मतदारसंघातून लढण्याचे जाहीर केले. भाजपच्या शायना एन. सी. यांना या मतदारसंघातून उमेदवारी हवी असून, गेले दोन महिने त्यांचे मतदारसंघात विभागवार दौरे सुरू झाले आहेत.

मनसेबाबत उत्सुकता

शिवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मनसेने निवडणूक लढविल्यास बाळा नांदगावकर आणि शिवसेनेचे अजय चौधरी यांच्यात चुरशीची लढत होऊ शकते.

माहिम मतदारसंघात मनसेवर सारे राजकीय चित्र अवलंबून आहे. २००९ मध्ये मनसेचे नितीन सरदेसाई हे निवडून आले होते, तर त्याआधी महानगरपालिका निवडणुकीत या मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये मनसेचे नगरसेवक निवडून आले होते; पण शिवसेनेने २०१४ मध्ये माहिम मतदारसंघ जिंकला, तर २०१७ मध्ये महानगरपालिका निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव करीत शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले. मनसे लढणार का? लढल्यास परत २००९ प्रमाणे लढत देणार का? असे अनेक प्रश्न आहेत.

वडाळा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये अद्यापही एकमत झालेले नाही. गेल्या वेळी कालिदास कोळंबकर हे काँग्रेसच्या वतीने निवडून आले होते. अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. १९९५ पासून कोळंबकर हे शिवसेनेच्या वतीने या मतदारसंघातून निवडून आले होते. पुढे नारायण राणे यांच्याबरोबर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कोळंबकर यांच्यासाठी भाजपला हा मतदारसंघ हवा आहे, तर मध्यंतरी नारायण राणे यांच्याबरोबर कोळंबकर हे गेल्याने शिवसैनिकांचा त्यांना विरोध आहे. शिवसेना कोणती भूमिका घेते यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.

सायन-कोळीवाडा मतदारसंघातून गेल्या वेळी भाजपचे कॅप्टन आर. तमिल सेल्वन हे निवडून आले होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांचा या मतदारसंघावर डोळा आहे.

धारावी मतदारसंघ हा पारंपरिकदृष्टय़ा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. एकनाथ गायकवाड यांच्यानंतर त्यांची कन्या वर्षां या लागोपाठ दोनदा या मतदारसंघातून निवडून आल्या. लोकसभा निवडणुकीत धारावीत काँग्रेसला सुमारे आठ हजारांचे मताधिक्य मिळाले.

मुंबई शहर जिल्हा

कुलाबा : भाजप

मुंबादेवी : काँग्रेस

मलबार हिल : भाजप

भायखळा : एमआयएम

शिवडी : शिवसेना

वरळी : शिवसेना

माहिम : शिवसेना

वडाळा : काँग्रेस

सायन कोळीवाडा : भाजप

धारावी : काँग्रेस