मुंबई: अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) सणासुदीच्या काळात हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बुधवारी मुंबईतून भेसळयुक्त खाद्यतेल आणि वनस्पती (डालडा) तुपाचा विरोधात मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. मुंबईतील विविध भागातील पाच ठिकाणी छापे टाकून एफडीएने तब्बल ५१,१२८ किलो भेसळयुक्त खाद्यतेल आणि वनस्पती तुपाचा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या साठ्याची किंमत एक कोटी चार लाख १४ हजार ११ रुपये आहे. एफडीएने खाद्यतेलाचे आणि वनस्पतीचे तुपाचे २४ नमुने ताब्यात घेतले असून या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
सणासुदीच्या काळात त्यातही दिवाळीत अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागणी वाढल्याने अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर एफडीएमार्फत दरवर्षी ऑगस्ट ते ३१ डिसेंबरदरम्यान विशेष मोहीम राबवून अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येते. दिवाळीत ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येते. यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई एफडीएने मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर बुधवारी, १९ ऑक्टोबरला पाच ठिकाणी छापे टाकून ५१,१२८ किलो इतके भेसळयुक्त खाद्यतेल आणि वनस्पती तूप जप्त केल्याची माहिती सहआयुक्त (बृहन्मुंबई) अन्न, एफडीए शशिकांत केकरे यांनी दिली.
दहिसर येथील अंकुल ऍग्रो येथून १५ लाख २४ हजार,९५८ रुपये किंमतीचा १२,४९२ किलो, कुर्ला सफल ट्रेडर्स येथून ४४ लाख ४८ हजार ८०० रुपये किंमतीचा ९,९९८ किलो, गोवंडीतील विमल ट्रेडर्स २ लाख ७८ हजार रुपये किंमतीचा २,३३० किलो, भायखळ्यातील इंदू ऑइल अँड सोप्स येथून ५ लाख ५ हजार १०६ रुपये किंमतीचा ५,००४ किलो, तसेच घाटकोपर येथील जय बजरंग ऑइल डेपो येथून ४१ लाख ६२ हजार २५३ रुपये किंमतीचा २१,३३४ किलो भेसळयुक्त खाद्यतेल आणि वनस्पती तुपाचा साठा जप्त करण्यात आला. यात नामांकित कंपनीच्या खाद्यतेलाच समावेश आहे. या पाचही ठिकाणी अन्न सुरक्षा कायदा मानके कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचे आढळले. त्यामुळे हा साठा जप्त करण्यात आला असून २४ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती केकरे यांनी दिली.