राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे एक विचित्र पेच निर्माण झाला आहे. पूर्व द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-कुर्ला संकुलास जोडणाऱ्या ‘बीकेसी कनेक्टर’ या उन्नत मार्गाचे ९ नोव्हेंबर रोजी लोकार्पण करण्याची घोषणा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केली होती. मात्र, सध्या राजकीय वातावरण तापले असताना या उन्नत मार्गाचे उद्घाटन कोणाचे हस्ते होणार की कोणत्याही समारंभाशिवाय तो वाहतुकीस खुला होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेला हा उन्नत मार्ग ९ नोव्हेंबरपासून वाहतुकीस खुला करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मागील आठवडय़ात जाहीर केले होते. बहुतांश वेळा मुंबईतील पायाभूत सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांचे हस्ते केले जाते. अशा प्रकल्पांच्या लोकार्पणाची चांगलीच जाहिरातबाजीदेखील केली जाते. पण सत्तास्थापनेतील गोंधळामुळे मुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच उन्नत मार्गाच्या कामाची श्रेय नामावली मांडणारी कोनशिलादेखील बसवली जाण्याची शक्यता दिसत नाही. विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील तीन नवीन मेट्रो मार्गाच्या पायाभरणी समारंभावेळी बीकेसी कनेक्टर भरपूर कौतुक केले होते. तसेच या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

लांबलेल्या पावसामुळे उन्नत मार्गाची अनेक कामे खोळंबली होती. उन्नत मार्ग खुला होण्यास होत असलेल्या विलंबाच्या पाश्र्वभूमीवर पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी आंदोलनाद्वारे लोकार्पण करण्याची भूमिका घेतली होती. त्या वेळी शेकडो कार्यकर्ते चुनाभट्टी येथे उपस्थित झाले होते. एमएमआरडीएकडून आठ दिवसांत उन्नत मार्ग वाहतुकीस खुला केला जाईल असे आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर मागील आठवडय़ात एमएमआरडीएने ९ नोव्हेंबर ही तारीख जाहीर केली होती.

सत्तास्थापनेतील सुंदोपसुंदीमुळे सध्या तरी हा उन्नत मार्ग कोणत्याही समारंभाविनाच वाहतुकीस खुला होण्याची शक्यता अधिक दिसत आहे. सत्तास्थापनेतील अस्थिरतेमुळे लोकार्पणाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री येतील की नाही याबाबत संदिग्धता असल्यामुळे  लोकार्पण कोणाच्या हस्ते करायचे यावर प्राधिकरणात चर्चा झाली. उन्नत मार्ग वाहतुकीस खुला करण्याची तारीख जाहीर केलेली असल्यामुळे तारीख बदलणे शक्य नसल्याचे प्राधिकरणातील  सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा

* या उन्नत मार्गामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरुन वांद्रे-कुर्ला संकुल गाठताना तीन किमी अंतर वाचणार आहे. एमएमआरडीएने या उन्नत मार्गाचे काम केले आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरून शीवनजीकच्या सोमय्या मैदान येथून सुरू होणारा हा १.६ किमी लांबीचा चार पदरी उन्नत मार्ग चुनाभट्टी स्थानक, कुर्ला-सायन रेल्वे मार्ग आणि मिठी नदीवरून जात वांद्रे-कुर्ला संकुलात उतरतो. उन्नत मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊन पूर्व उपनगरातून वांद्रे-कुर्ला संकुलात येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास जलद होईल.

* दुसरीकडे गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासून शीव येथील उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम प्रलंबित असून निविदा मंजूर होऊनदेखील या कामाची सुरुवात झालेली नाही. बेअरिंग बदलण्याचे काम सुरू होण्यापूर्वी बीकेसी कनेक्टर सुरू होत असल्यामुळे किमान वांद्रे-कुर्ला संकुलात जाणाऱ्या वाहनांना तरी याचा फटका बसणार नाही.