मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खानची अखेर आज मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून सुटका करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आर्यन खान शनिवारी तुरुंगातून बाहेर आला आणि वडिलांसोबत कारमध्ये मन्नतला पोहोचला. मुलगा आर्यन खानला घेण्यासाठी शाहरुख खान स्वत: आर्थर रोड तुरुंगात गेल्याचे सांगण्यात येत आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन सकाळी ११ वाजल्यानंतर तुरुंगातून बाहेर आला. दोन दिवसापूर्वीच विशेष न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानंतर शाहरुख खानचे निवासस्थान असलेल्या मन्नत बंगल्याबाहेर त्याच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी गर्दीमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी सापळा रचत चोरांच्या टोळीला रंगेहाथ पकडले आहे.

मन्नत परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने चोरांनीदेखील हातसाफई केल्याचे पाहायला मिळत आहे. मन्नत परिसरातून गर्दीच्या वेळी मोबाईल चोरीच्या घटना वारंवार समोर येत होत्या. त्यानंतर आर्यन खानच्या सुटकेनंतर शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी चोरांच्या टोळी अनेकांचे मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत या टोळीला ताब्यात घेतले आहे.

आर्यन खानच्या सुटकेनंतर मन्नत बाहेर शाहरुखच्या चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच हे चोर शाहरूखचे चाहते म्हणून या गर्दीमध्ये सामील झाले होते. यावेळी त्यांनी गर्दीमध्ये लोकांचे मोबाईल आणि पाकिटे चोरण्याचा प्रयत्न केला. आर्यन खान प्रकरणापासून मन्नतबाहेर लोकांची गर्दी वाढल्याने ही टोळी सक्रिय झाली होती. शुक्रवारी चोरीची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर पोलिसांनी शनिवारी सापळा रचत या सर्वांना अटक केली आहे.

मागील अनेक दिवसांपासून मन्नत परिसरात चोरीच्या घटना घडत होत्या. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांनी आपण काहीच केले नसल्याचे माध्यमांना सांगितले.

दरम्यान, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला होता. शाहरुखची मैत्रीण आणि अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी संध्याकाळी २३ वर्षीय आर्यनच्या जामिनासाठी ड्रग्जशी संबंधित खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टात हजर झाली. हायकोर्टाने शुक्रवारी आपल्या आदेशाचा मुख्य भाग उपलब्ध करून दिला ज्यामध्ये आर्यन खान आणि या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या आहेत. तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीनदारावर आणि तत्सम रकमेच्या दोन जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.