मुंबई : हार्बर आणि ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकलना प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असून सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावर ही वातानुकूलित लोकल चालवण्याचा विचार मध्य रेल्वेकडून केला जात आहे. सीएसएमटी ते पनवेल मार्गावर १ डिसेंबरपासून वातानुकूलित लोकल चालवण्यात आली. या लोकलच्या दिवसाला बारा फेऱ्या होतात, तर जानेवारी २०२० मध्ये ठाणे ते वाशी, पनवेल ट्रान्स हार्बरवरही वातानुकूलित लोकल चालवताना त्याच्या १६ फेऱ्या होत आहेत. या लोकलना प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. सीएसएमटी ते पनवेलवरील १२ फेऱ्यांमधून मिळून सरासरी ८०, तसेच ट्रान्स हार्बरवरील सर्व फेऱ्यांमधून दररोज सरासरी ४० ते ५० प्रवासी प्रवास करतात. एका वातानुकूलित लोकल गाडीची एकूण प्रवासी क्षमता ५,९६४ आहे. यात १,०२८ प्रवासी आसनक्षमता व ४,९३६ प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतील. मात्र मिळत असलेला प्रतिसाद पाहता तो फारच कमी आहे. अल्प प्रतिसादामुळे या मार्गावरील लोकल   मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गावर चालवण्याचा विचार आहे. ठाणे ते दिवा पाचवा, सहावा मार्ग झाल्यानंतर नवीन फेऱ्यांची भर पडणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असून त्यात वातानुकूलित लोकलचाही समावेश असेल. याबरोबरच सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावरही वातानुकूलित लोकल चालवण्याचा विचार केला जात आहे. या मार्गावर सध्या सामान्य लोकल धावत असून तेथे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा मध्य रेल्वेला आहे. सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावर दररोज सामान्य लोकलच्या ४४ फेऱ्या होतात. यातील काही सामान्य फेऱ्यांच्या बदल्यात वातानुकूलित लोकल चालवण्याचा विचार होत असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

कमी प्रतिसादामुळे मार्गबदल 

हार्बर, ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांना कमी प्रतिसाद मिळत असतानाच सीएसएमटी ते कल्याण या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वातानुकूलित लोकललाही कमी प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या मार्गावर दररोज १२ फेऱ्या होत असून या सर्व फेऱ्यांमधून सरासरी १५० प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सीएसएमटी ते कल्याण धीम्या मार्गावर धावत असलेली वातानुकूलित लोकल जलद मार्गावर चालवण्याचाही विचार होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air conditioned local csmt goregaon route ysh
First published on: 31-12-2021 at 00:23 IST