२०२२ या वर्षातला आजचा शेवटा दिवस आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण सज्ज झाला आहे. त्यानिमित्ताने अनेक जण विविध संकल्प करतानाही दिसून येत आहेत. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नववर्षानिमित्त नेमका काय संकल्प केला आहे? याबाबत त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी सर्वांना नवीन वर्षानिमित्त शुभेच्छाही दिल्या.

हेही वाचा – संभाजीराजेंचा ‘धर्मवीर’ उल्लेख केल्याने संतापलेल्या अजित पवारांना फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले “त्यांच्या विचारांच्या लोकांनी…”

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

“2022 हे वर्ष आमच्यासाठी समाधानकारक गेलं नाही. पहिले सहा महिने ठिक गेलं. मात्र, शेवटच्या सहा महिन्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. परंतु अशा घटना घडत असतात. लोकशाहीत जे प्रसंग समोर येतात त्याचा सामना करण्याचं काम राजकीय नेत्यांना करावं लागतं. त्यामुळे आता विरोधी पक्षाची जबाबदारी आमच्यावर आहे, येत्या वर्षात आम्ही ती योग्य पद्धतीने पार पाडू”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

पुढे बोलताना, “आम्ही कोणीही गोष्टी राजकीय दृष्ट्या न बघता ज्यात महाराष्ट्राचं हित असेल, त्या गोष्टीला आम्ही विरोध अजिबात करणार नाही. ज्या गोष्टी चुकीच्या होतील, त्या गोष्टी आम्ही सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आणून देऊ, असेही ते म्हणाले. तसेच येत्या वर्षात महाराष्ट्रावर कोणतंही संकट येऊ नये, करोना परत येऊ नये, यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – “आमच्या सहनशीलतेचा अंत झाला तर…”, शिंदे गटाचा अजित पवारांना इशारा; शंभूराज देसाई म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नवीन वर्षात तुमचा काय संकल्प असेल? याबाबत विचारलं असता, “नवीन वर्ष येत असतं. आम्ही आमच्या पद्धतीने पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडून कोणतीही चूक होऊ न देण्याचा निश्चय आम्ही करू. तसेच आपल्या सद् विवेक बुद्धीला धरून ज्या गोष्टी करता येईल, त्या गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच नवीन वर्ष सर्वांना सुख-समाधानाचं आणि भरभराटीचं जावो”, अशी शुभेच्छाही त्यांनी दिल्या.