मुंबई : मांसविक्री बंदीचे ठराविक दिवस राज्य शासनाने निश्चित केलेले आहेत. त्यानंतर आता स्वातंत्र्यदिनी बंदी घालणे सर्वस्वी चुकीचे असल्याची रोखठोक भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी घेतली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवलीसह नागपूर, मालेगाव, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या महापालिकांनी मांसविक्रीवर बंदी घातल्याचे आपल्याला बातम्यांमधून समजल्याचे अजित पवार म्हणाले. ‘‘आपल्याकडे अनेक जाती-धर्मांचे लोक आहेत. आहाराच्या अनेक पद्धती आहेत. प्रत्येकाच्या श्रद्धा वेगवेगळ्या असतात. मांसाहार काहींचा मुख्य आहार आहे. महावीर जयंती, आषाढी एकादशी, महाशिवरात्री या दिवशी मांसविक्रीवर बंदी लोकांनी मान्य केली आहे. पण, आता स्वातंत्र्यदिनी हा नवा पायंडा पाडला जात आहे,’’ अशी टिप्पणी पवार यांनी केली.

दरम्यान, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यासंदर्भातला निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला. त्यांच्यामुळे राज्यातील साखर कारखानदारी टीकून आहे. मात्र साखर कारखान्याने वार्षिक पत्रिकेत मोदी-शाह यांच्या अभिनंदन केले जात नाही. काहींना जनाची नाहीच पण मनाची लाज नाही, अशी टीका भाजप नेते व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, विखे- पाटील यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. ते भेटले की मी त्यांना याबाबत विचारेन. इथेनॉलचा निर्णय मोदी-शाह यांच्यामुळे झाल्याचे मी मान्य करतो. साखर कारखाना सभासदांचा असतो, तिथे उगीच खर्च करण्याला आपला विरोध असतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्रीपदाचा वाद नाही

नाशिक आणि रायगड जिल्ह्यांत पालकमंत्री पदावरुन शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये वाद नाही. पालकमंत्री नियुक्तीचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो. मुख्यमंत्री तो निर्णय योग्य वेळेत घेतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री नाहीत म्हणून कुठले काम अडलेले नाही. आमदारांना विकास निधी मिळत नाही, या आमदार संजय गायकवाड यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. रोहयो मंत्री भरत गोगावले हे रायगड पालकमंत्रीपदावरुन नाराज नसल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच अनुसूचित जातीच्या आरक्षण वाढीचा निर्णय जातीय जनगणनेनंतर होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.