कांदिवली पश्चिमेला पोयसरजवळ ‘अल-शॉर्मा’ नावाचे छोटे दुकान आहे. दुकान म्हणजे खरे तर पाच बाय पाच फूटांचे केवळ लाइव्ह किचन. त्यामध्ये शॉर्माची मशीन, फ्राइजसाठी इलेक्ट्रॉनिक फ्रायर आणि तंदुरीसाठी कोळशाची शेगडी एवढेच आहे. तुम्हाला बसायचे असेल तर रस्त्यावर टेबले मांडलेली आहेत किंवा तुम्ही गाडीतून गेले असाल तर त्यामध्ये बसून तुम्ही आस्वाद घेऊ शकता. पोयसर जिमखान्याजवळ इंदिरानगरच्या कोपऱ्यावर ‘अल-शॉर्मा’ असल्याने तिथून जाणाऱ्या प्रत्येकाला हे ठिकाण आता चांगलेच परिचयाचे झाले आहे. कारण धगधगणाऱ्या शेगडीकडे आणि त्यावर भाजल्या जाणाऱ्या चिकनकडे तुमचे दुर्लक्ष होणे अशक्यच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सनी डिसूझा यांनी २०१२ मध्ये ‘अल-शॉर्मा’ची सुरुवात केली. पहिल्यापासूनच त्यांच्याकडे अगदी मोजके पदार्थ मिळतात. त्यापैकी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ‘शॉर्मा’. मुंबईत काही ठिकाणी शॉर्मा मिळत असला तरी इतर ठिकाणी मिळणारा शॉर्मा आणि येथे मिळणाऱ्या शॉर्माचा आकार, चव आणि किमतीत खूप फरक आहे. येथे रेग्युलर शॉर्माचे चार आणि चिकन टिक्काचे चार प्रकार मिळतात. विशेष म्हणजे ‘चिकन टिक्का शॉर्मा’ मिळणारे संपूर्ण मुंबईतील हे एकमेव ठिकाण आहे, असा डिसूझा यांचा दावा आहे.

सर्वप्रथम पिटा ब्रेड म्हणजेच खबूस घेऊन तो शॉर्मा मशीनवर हलकासा भाजून घेतला जातो. त्यानंतर त्यावर ऑर्डरप्रमाणे तिखट, गार्लिक, स्वीट किंवा सेझवान सॉस पसरवला जातो. ‘पिकल’ म्हणजेच व्हिनेगरमध्ये मुरवत ठेवलेले काकडी, बीटचे लांब चिरलेले काप त्यावर ठेवले जातात. नंतर बारीक चिरलेला कोबी आणि गाजर टाकले जाते. यानंतर खरी मजा असते. कारण तेव्हा असली मसाला त्यामध्ये भरला जातो आणि ते म्हणजे मंद आचेवर भाजत असलेले चिकन. एका मोठय़ा चाकूने चमच्याच्या साहाय्याने विशिष्ट पद्धतीने ते चिकन कातरून घेतले जाते. मग फ्रेंच फ्राइज आणि ते चिकन ठासून भरले जाते. त्यावर बटर पेपर लावून शॉर्माचे एका बाजूचे तोंड उघडे ठेवून खालच्या बाजूचे टोक बंद करण्यात येते. प्लेटमध्ये मेओनिज सॉस आणि पिकलसोबत सव्‍‌र्ह केला जातो. याचा घास घेताना शॉर्माच्या आकारामुळे तुम्हाला कदाचित कष्ट पडतील. पण त्याचा एक घास जरी तोंडात गेला तरी तुमचे अधाशी मन हातातल्या उरलेल्या शॉर्माचा फडशा पाडण्यासाठी आतूर होईल.

शॉर्मासाठी वापरला जाणारा प्रत्येक सॉस सनी डिसूझा स्वत: बनवतात. त्यामुळे त्याची चव बाजारात किंवा इतर दुकानांमध्ये मिळणाऱ्या सॉसपेक्षा वेगळी आहे, हे शॉर्मा चाखल्यावर लगेच लक्षात येते. रेग्युलर आणि चिकन टिक्का शॉर्मामध्ये हॉट अँड स्पाइसी, सेझवान, टँगी टोमॅटो हे प्रकार मिळतात. तर ग्रिलमध्ये चिकन लेग, चिकन ब्रेस्ट आणि चिकन टिक्का हे प्रकार मिळतात. चिकन लेग आणि चिकन टिक्का ग्रिल पुदिना फ्लेवरमध्येही मिळते. कोिथबीर, पुदिना, हिरवी मिर्ची, आले हे सर्व एकत्रित वाटून तयार केलेली चटणीही ग्रिलसोबतच्या पदार्थाबरोबर दिली जाते. व्हेज खाणाऱ्यांना इथे बंदी आहे असे नाही. त्यांच्यासाठीही पनीर आणि व्हेज शॉर्माआणि फिंगर चिप्स मिळतात. शाॉर्माची किंमत ९० रुपयांपासून ते दीडशे रुपयांपर्यंत आहे. ग्रिलसुद्धा १३० ते १५० रुपयांपर्यंत मिळते. गेल्या पाच वर्षांत ‘अल-शॉर्मा’ची ख्याती दहिसरपासून ते अंधेरीपर्यंत पसरलेली आहे. इथे फक्त तरुण मंडळी येत नाहीत तर अनेक जण सहकुटुंब येतात.

शॉर्मासाठी मुख्य बाह्य आवरण असणारा पिटा ब्रेडही वरळीच्या प्रसिद्ध ‘डेली ब्रेड’ बेकरीमधून मागवला जातो. ब्रेड असो वा चिकन, प्रत्येक गोष्ट दररोज ताजी आणली जाते. कुठलाही पदार्थ इथे बनवून ठेवला जात नाही. ऑर्डर आल्यावरच तो तुमच्यासमोर बनवला जातो. पार्सल देतानाही प्रत्येक पदार्थ चांगल्या दर्जाच्या सिल्वर फॉइलमध्ये पॅक करून दिला जातो. त्यामुळे घरी गेल्यावरही तो गरमागरमच खायला मिळतो.

अलशॉर्मा

  • कुठे? – शॉप क्र. २, इंदिरा नगर, पोयसर जिमखाना जवळ, कांदिवली (पश्चिम), मुंबई – ४०००६७
  • कधी? – संध्या. ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत.

prashant.nanaware@indianexpress.com
Twitter – @nprashant

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Al shawarma in kandivali
First published on: 05-11-2016 at 01:44 IST