मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर झोपलेल्या प्रवाशांचे मूल चोरण्याच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर कुल्र्यातील काही सतर्क रिक्षाचालकांमुळे शुक्रवारी सकाळी फलाटावर झोपलेली एक दोन वर्षांची मुलगी उचलून नेणाऱ्या एकास पकडण्यात यश आले.
कुर्ला येथील हमीद शेख हे पत्नी सखिना, मुलगी इच्छा (३) व फिझा (२) यांच्यासह गोरेगावला जाण्याला लोकल पकडण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले. पण शेवटची गाडी हुकल्याने पहाटेची गाडी पकडण्याचे त्यांनी ठरवले आणि कुर्ला पूर्वेच्या दिशेला फलाट क्रमांक नऊ या वापरात नसलेल्या फलाटावर विश्रांती घेण्यासाठी गेले. पहाटेच्या सुमारास हे कुटुंब झोपेत असल्याचा फायदा उचलत मुजफ्फर खान (२५) या तरुणाने छोटय़ा फिझाला उचलले आणि तिला घेऊन तो बाहेर पडला. कुर्ला पूर्व येथील काही दक्ष रिक्षाचालकांचे लक्ष लहान मुलीला घेऊन जाणारा मुजफ्फरकडे गेले. त्यांनी पोलिसांच्या नजरेस ही गोष्ट आणली. यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तो मुलीला उचलून नेत असल्याचे समोर आले, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. एस. धुमाळ यांनी सांगितले. मुजफ्फरला अटक केल्यानंतर आपल्या पत्नीला मूलबाळ होत नसल्याने आपण हे कृत्य केल्याचा जबाब त्याने दिला. पण त्याचा मूल चोरून त्यांना भिकेला लावणारी टोळी या मागे आहे काय, याचा पोलीस शोध घेत आहेत.