राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारातही शिवसेना सहभागी न होण्याची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना-भाजपमधील तणाव कमालीचा वाढला असून, शिवसेनेकडून होत असलेल्या आंदोलनांमुळे भाजप अध्यक्ष अमित शहा संतापले आहेत. ‘सामना’ जाळण्याच्या मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांच्या वक्तव्यामुळे आणि मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या ‘मनोगत’मधील लेखामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही चिडले असून भाजपने माफी मागितल्याशिवाय तडजोड करायची नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. ‘घटस्फोट कधी घेणार, सत्तेच्या ताटावरून कधी उठून जाणार,’ अशी अपमानास्पद भाषा भाजपने लेखात वापरल्यामुळे शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही, हे दाखवून देण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारामध्येही शिवसेना सहभागी न होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन्ही पक्ष आक्रमक असल्याने दोन्ही पक्ष रस्त्यांवरही एकमेकांना भिडण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी औरंगाबादमध्ये बोलताना ‘निजामाच्या बापाचे सरकार’ या भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. तेव्हापासून भाजप नेत्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यानंतर ‘मनोगत’मध्ये भांडारी यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केल्यानंतर आणि अ‍ॅड. शेलार यांच्या वक्तव्यांमुळे शिवसेना कार्यकर्तेही बिथरले आणि आंदोलने करण्यात आली. त्यात अमित शहा यांचा गब्बरसिंग असा अवमानकारक उल्लेख करण्यात आल्याने शहा आणि भाजप नेतेही संतापले आहेत. शहा यांनी राज्यातील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याशी यासंदर्भात चर्चा करून घडामोडींची माहितीही घेतल्याचे समजते.

शिवसेनेच्या आंदोलनांमध्ये शहा, शेलार यांची वैयक्तिक निंदानालस्ती, जोडे मारणे असे प्रकार झाले. त्यामुळे शिवसेनेने हे प्रकार बंद करून माघार घेतल्याशिवाय भाजप नेते ठाकरे आणि शिवसेना नेत्यांबरोबर एका व्यासपीठावर न जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅड. शेलार यांनी ‘सामना’ जाळण्याची भाषा केल्याने शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर त्यांनी काही हस्तक्षेप केल्याचे समजते. पण तरीही दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ते हे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत.

भंडारी यांच्या लेखानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ते वैयक्तिक मत असल्याचे सांगितले आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही शांततेचे आवाहन केल्याने भाजप नेतेही नाराज आहेत. पक्षनेत्यांचा अपमान होत असताना शिवसेनेच्या विरोधात साधे पत्रकही जारी करण्याची िहमत दानवे यांनी न दाखविता सरचिटणीस सुरजीतसिंह ठाकूर यांच्या नावे ते मंगळवारी जारी केले. शिवसेनेकडून किती अपमान सहन करायचा, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

* शिवसेनेने दोन राज्यमंत्रीपदांसाठी नावे न दिल्यास त्यांच्याशिवाय विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले असले, तरी या वातावरणात विस्तार करावा की नाही, याबद्दल त्यांची द्विधा मन:स्थिती आहे.

* पुढील काळात दोन्ही पक्षांमधील वाद शमण्याची चिन्हे दिसत नसून भाजपला ‘शिवसेना स्टाइल’ने अद्दल घडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे. त्यामुळे काही दिवसांमध्ये राडे सुरू होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All is not well between shiv sena bjp in maharashtra
First published on: 30-06-2016 at 02:37 IST