मुंबई : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे तिथे अडकलेल्या राज्यातील १७१ पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सर्व सुरक्षित ठिकाणी आहेत. उर्वरित एक पर्यटक कृतिका जैन यांच्याशीही संपर्क साधण्याचे प्रयत्न आहेत. राज्यातील सर्व पर्यटक सुखरूप आहेत. त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी दिली.
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन डेहराडूनमध्ये दाखल झाले असून त्यांनी विविध ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनाची माहिती दिली. तसेच परिसरातील रस्ते देखील पूर्ववत सुरू करून त्याद्वारे नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास विभाग राज्यमंत्री अजय टम्टा यांची देखील महाजन यांनी भेट घेऊन चर्चा केली.
राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे महाजन यांनी सांगितले. धराली परिसरात एकूण १७२ पर्यटकांपैकी १४७ पर्यटक विविध ठिकाणी सुखरूप आहेत. सुरक्षित असलेल्या पर्यटकांनी त्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार पुढील वाटचाल सुरू केली आहे, तर २४ पर्यटक हर्षील येथे सुरक्षित असून त्यांना हवाईमार्गे हलविण्यात येणार आहे.