‘एमटीडीसी’ आणि ‘जेएनपीटी’कडून प्रयत्न; ऑगस्टपर्यंत सेवा अपेक्षित
रस्त्यावरून बसने जाताना खूपच वाहतूक कोंडी असली की, अनेकदा बस उडायला लागली तर किंवा पाण्यातून जायला लागली तर.. असे स्वप्नरंजन मुंबईकरांनी अनेकदा केले असेल. मुंबईकरांचे हे स्वप्न ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्या एकत्रित प्रयत्नातून मुंबईत भू-जलचर (अॅम्फिबियस) बस दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या या बसची बांधणी अमेरिकेत सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. ही बस मुंबईत दाखल झाल्यानंतर पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल.
मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भू-जलचर बस मुंबईत चालवण्याबाबतचा निर्णय एमटीडीसीने घेतला होता. परदेशात अशा प्रकारची बस चालत असून तोच प्रयोग मुंबईत करण्याचा निर्णय झाला होता. ही बस मुंबईत चालवण्याबाबत जेएनपीटी आणि एमटीडीसी यांच्यात सामंजस्य करारही झाला होता. त्यानुसार सध्या एकच बस मुंबईत येण्याच्या मार्गावर आहे. ही बस अमेरिकेत तयार होत असून त्या बसचे इंजिन आणि विद्युत प्रणाली स्विडनमध्ये तयार होणार आहे. या बसमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सर्व गोष्टींची खातरजमा करून घेण्यात आली आहे.
किंमत चार कोटी..
उभयचर बसची किंमत चार कोटी रुपयांच्या आसपास आहे. तसेच या बसमध्ये ५० आसने असतील. ही बस सध्या गिरगाव चौपाटी येथून समुद्रात नेण्याचा आणि त्यानंतर दक्षिण मुंबईतील सर्व प्रेक्षणीय स्थळे या बसमधून दाखवण्याचा प्रस्ताव आहे. या पर्यटनस्थळांची माहिती देणारा माहीतगार बसमध्ये असेल. तसेच बसमध्ये पर्यटकांना शीतपेये, पाणी आदी गोष्टी पुरवण्यात येतील, असे एमटीडीसीतील सूत्रांनी स्पष्ट केले.