लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी सट्टेबाज अनिल जयसिंघानी व त्याची मुलगी अनिक्षा यांना अटक केली होती. अनिल जयसिंघानी आणि अनिक्षा जयसिंघानी यांनी खंडणीसाठी तयार केलेली ध्वनीचित्रफीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात अनिक्षाने अमृता फडवणवीस यांना पाठवलेल्या धमकीच्या संदेशांचाही समावेश आहे.

Arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात इन्सुलिन देण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल
Sharad pawar on Udyanraje bhosale lok sabha election
“राजेंबद्दल आम्ही प्रजा…”, उदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, भाजपाला टोला
Gautam Navlakha
नजरकैदेत ठेवण्याची मागणी गौतम नवलखांना पडली भारी; एनआयएनं दिलं १.६४ कोटींचं बिल
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन

मलबार हिल पोलिसांनी याप्रकरणी मे महिन्यात न्यायालयात ७३३ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. ७३३ पानांच्या या आरोपपत्रात १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. त्यात याप्रकरणाबाबत अनेक गंभीर खुलासे झाले आहेत. अमृता फडणवीस यांनी अनिक्षाच्या धमक्यांमुळे तिचे दूरध्वनी घेणे बंद केले होते. तसेच तिचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक केला होता. त्याबाबत २१ फेब्रुवारीला अनिक्षाने पाठवलेल्या संदेशात तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्यामुळे तिचे वडील अनिल जयसिंघानी रागावले आहेत. ते तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हानी पोहोचवतील अशी थेट धमकीच दिली आहे.

आणखी वाचा-“जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचा रेट किती आहे, हे…”, लाच घेण्याचे रेटकार्ड सांगत अजित पवारंचे गंभीर आरोप

अनिक्षाने फॅशन डिझायनर असल्याचे सांगून जवळीक साधत गुन्हेगारी प्रकरणातून वडिलांना बाहेर काढण्यासाठी मदतीची मागणी केली. याबदल्यात सट्टेबाजांकडून सट्ट्यातून मिळणारे पैसे, तसेच मदत करण्यासाठी एक कोटी रुपये देऊ केले. तसेच बनावट ध्वनीचित्रफीत पाठवून त्याआधारे करीत १० कोटींची खंडणी मागितली होती. संबंधीत ध्वनीचित्रफीत व ध्वनीफीत शरद पवार व उद्धव ठाकरे यांना देतील, तसेच मोदीजींनाही देतील, अशी धमकी अनिक्षाने दिल्याचे तिने पाठवलेल्या संदेशांवरून स्पष्ट होत आहे.

अमृता फडणवीस यांनी २० फेब्रुवारी रोजी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीमध्ये अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानिया यांनी लाच देऊन अडकविण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले होते. ‘अनिक्षा ही १६ महिन्यांपेक्षा अधिक काळ संपर्कात होती. १६ फेब्रुवारीच्या रात्री साडेनऊ वाजता तिने माझ्याशी संपर्क साधला आणि तिच्या वडिलांचे एका प्रकरणात आरोपी म्हणून नाव आले आहे, असे सांगितले. या गुन्ह्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली. हे ऐकताच अमृता फडणवीस यांनी दूरध्वनी बंद केला होता व तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. त्यामुळे १८ फेब्रुवारीला रात्री ११.५५ ते मध्यरात्री १२.१५ या वेळेत तिने २२ चित्रफिती, तीन व्हॉइस नोट्स आणि व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून अनेक संदेश पाठवले. अशाच प्रकारच्या चित्रफिती, व्हॉइस नोट्स आणि संदेश कर्मचाऱ्यांना आले. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता त्याच क्रमांकावरून सुमारे ४० संदेश, ध्वनीचित्रफीत, व्हॉइस नोट्स आणि काही स्क्रीनशॉट्स फडवणीस यांना पाठवण्यात आले. त्याआधारे अनिक्षा अमृता फडणवीस यांना धमकावत होती, अशी तक्रार अमृता मलबार हिल पोलिसांकडे केली. त्याद्वारे अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.