अमृता शेरगिलचे नाव आजवर केवळ ऐकून माहीत असणाऱ्यांना तिच्या तब्बल ९५ चित्रांचा खजिनाच १ जूनपासून पाहायला मिळणार आहे, तर या प्रदर्शनापासून अगदी हाकेच्या अंतरावर दुसरं- ‘मुंबई शैली’च्या चित्रांचं प्रदर्शन ११ जूनपासून प्रेक्षकांसाठी खुले होणार आहे. एकंदरीत, मुंबईकर आणि मुंबईतले पाहुणे यांच्यासाठी जून महिन्यात जुनी चित्रे पाहण्याची चंगळच होणार आहे.
अमृता शेरगिल या चित्रकर्तीने अल्पायुषी (१९१३ – १९४१) असूनही चित्रकलेत मोठे काम केले. जन्म परदेशातला, आई ऑस्ट्रियन अशी पाश्र्वभूमी असलेली अमृता १९२१ साली पितृभूमीच्या ओढीने भारतात येते, अजिंठय़ाची चित्रे पाहून पाश्चात्त्य शैलीचा त्यागच करते आणि त्यातून एक नवीच चित्रशैली निर्माण होते, ही विसाव्या शतकातल्या चित्रकलेच्या इतिहासात घडलेली खरे तर एक महत्त्वाची आणि काहीशी अद्भुतही गोष्ट. पण पाश्चात्त्य कलेला मिळालेले हे भारतीय प्रत्युत्तर आज अनेक राष्ट्राभिमान्यांना माहीतही नसते. अमृता यांच्या जन्मशताब्दी वर्षांत, दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) म्हणजेच राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या चित्रागारात सुरक्षित असलेली तिची सारी चित्रे कालानुक्रमे प्रदर्शित करण्याचे काम कलेतिहासाच्या अभ्यासक यशोधरा दालमिया यांनी केले. हेच प्रदर्शन आता मुंबईत रीगल सिनेमासमोरच्या मुंबई-एनजीएमएमध्ये सकाळी ११ ते साडेपाच या वेळेत (रविवार सुरू, सोमवार बंद) ३० जूनपर्यंत खुले राहणार आहे.
याच रीगल सिनेमासमोरच्या ‘श्यामाप्रसाद मुखर्जी चौका’त, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) ‘मुंबई शैली’च्या- म्हणजे किमान ५० वर्षे ते १४० वर्षे जुन्या चित्रांचे प्रदर्शन भरते आहे. मुंबईच्या ‘सर ज जी कला महाविद्यालयात ब्रिटिश अमलाखाली पाश्चात्त्यच पद्धतीचे कलाशिक्षण भारतीय दृश्य-संदर्भात आत्मसात करणारे गुणी चित्रकार आणि पुढे ब्रिटिशांनीच या कलाशाळेत भारतीय लघुचित्रांसारख्या चित्रपद्धतीचाही एक वर्ग समाविष्ट केल्यानंतर येथील विद्यार्थ्यांनी घडवलेली नवी, वळणदार चित्रशैली यांना एकत्रितपणे ‘बॉम्बे स्कूल’ असा शब्द कलेच्या इतिहासात रूढ आहे. मुंबईने बॉम्बे हे नाव फेकून दिले, जेजेतून शिकलेले चित्रकारही पुढे नवनव्या तंत्रांचा अवलंब करूनच मोठे झाले, परंतु आजही जेजेच्या रेखा व रंगकला – म्हणजे फाइन आर्ट- विभागातील कलाशिक्षणात या शैलीचा अंश टिकून राहिलेला आहे. आधुनिक भारतीय चित्रकलेमध्ये टागोरांच्या बंगालचे योगदान आहेच, पण महाराष्ट्राचा आणि खास करून मुंबईचाही वाटा आहे. ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’ने या इतिहासाच्या अनेक खुणा जपल्या, त्यापैकी काही चित्रकारांनी पुढे वाटच बदलल्यामुळे, त्यांची म्युझियमकडील चित्रे दुर्मीळ ठरली. अशी सारी चित्रे एकत्रित पाहायला मिळण्याचा योग १९९७ नंतर प्रथमच येतो आहे, मात्र त्यासाठी ११ जूनपर्यंत प्रेक्षकांना वाट पाहावी लागेल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

*झाडांमागल्या ग्रामीण स्त्रियांचे, अमृता शेरगिलने तिच्या भारतभेटीत केलेले चित्रण.
*जेजे आर्ट स्कुलात भारतीय चित्रशैली शिकवणारे जगन्नाथ अहिवासी यांच्या ‘द मेसेज’ या चित्रावरही लघुचित्र शैलीची छाप दिसते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amrita sher gil jj arts old portraits exhibition
First published on: 01-06-2014 at 04:15 IST