क्षमता, आवड व बुद्धिमत्ता यांची सांगड घालूनच निवड करण्याचा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचा सल्ला
आपले करिअर हे निरोगी, आनंदी आयुष्याचे साधन असायला हवे, असे सांगत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी करिअर आणि निकोप आयुष्य यांचा परस्पराशी असलेला संबंध उलगडत यशाचा मार्गही उपस्थित विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दाखवला.
‘मार्ग यशाचा’ कार्यशाळेत डॉ. नाडकर्णी यांच्याबरोबरच करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांचे मार्गदर्शन पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांना लाभले. याशिवाय शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आणि क्रीडा प्रशिक्षक वर्षां उपाध्ये, गेली १७ वर्षे आवाजाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या रश्मी वारंग, जाहिरात क्षेत्रातील उच्चपदस्थ अभिजित करंदीकर आणि डिजिटल मीडियातज्ज्ञ धनश्री संत यांनी पहिल्या दिवशी क्रीडा, रेडिओ, जाहिरात व डिजिटल मीडिया या क्षेत्रातील विविध संधीची माहिती दिली. तसेच नीट आणि जेईई परीक्षांच्या अभ्यासाबद्दल मार्गदर्शन दत्तात्रय नेरकर, विनायक काटदरे, डॉ. निर्मलकुमार कुर्वे आणि रजनीकांत भट्ट या तज्ज्ञांनी शेवटच्या सत्रात केले.
अनुभव ऐका
आपले व्यक्तिमत्त्व, क्षमता, आवड, बुद्धीमत्ता यांची सांगड घालून जे करिअरचे पर्याय समोर येतील त्याची निवड करायला हरकत नाही. करिअरची निवड करताना फक्त इंटरनेटवरील माहितीवर अवलंबून न राहता त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तींची पद्धतशीरपणे वेळ घेऊन भेट घ्या, त्यांचे अनुभव ऐका. यातून तुम्हाला त्या करिअरचे अनेक पैलू समजतील, असा महत्त्वाचा सल्ला डॉ. नाडकर्णी यांनी यावेळी दिला.
समाजमाध्यमांमध्येही संधी
तरुण पिढीला डिजिटल माध्यमातील करिअर संधींची ओळख डिजिटल मीडियातज्ज्ञ धनश्री संत यांनी करून दिली. माध्यमांद्वारे काय पोहचवायचे, ते सादर कसे करायचे, आपला प्रेक्षक कोण असेल याचा अभ्यास केला जातो. समाजमाध्यमे ही दिसायला सहज सोपी असली तरी त्यांची रचना तितकीच गुंतागुतीची आहे. त्यामुळे ती समजून घेऊन त्यात काम करण्याची आवड असेल तर अगदी अप्लिकेशनच्या डिझाईनपासून ते त्याच्या प्रोग्रामिंगपर्यंतच्या अनेक संधी या क्षेत्रात उपलब्ध असल्याचे धनश्री संत यांनी सांगितले.
खेळाव्यतिरिक्तही संधी
खेळ या क्षेत्राचे वयोमान कमी असल्यामुळे फार कमीजण याची निवड करतात, असे सांगत क्रीडा प्रशिक्षक वर्षां उपाध्ये यांनी खेळाव्यतिरिक्त असलेल्या या क्षेत्रातल्या संधीची माहिती दिली. खेळ व्यवस्थापक, फिजियोथेरपीस्ट, आहारतज्ज्ञ अशी खेळाशी संलग्न असलेल्या अनेकांची कमतरता या क्षेत्रामध्ये आहे.
आवाजाची ताकद
फक्त आवाज चांगला असणे पुरेसे नसून आवाजाची ताकद, त्याचा कौशल्याने वापर, सराव करणे हे आरजे होण्यासाठी गरजेचे असल्याचे आरजे रश्मी वारंग यांनी सांगितले. आरजे व्यतिरिक्त डबिंग, जाहिरात, वृत्तवाहिन्यामध्ये केले जाणारे व्हॉईस ओव्हर, सूत्रसंचालक यामध्येही अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या मुलांनी दहावी-बारावीपासूनच आकाशवाणीच्या युवावाणी, कम्युनिटी रेडियो यासारख्या ठिकाणी कामाचा अनुभव घ्या. यामुळे तुमच पाया पक्का होईल, असे वारंग यांनी सांगितले.
जाहिरात क्षेत्रात अनेक संधी
जाहिरात हे क्षेत्र जरी कलेची आवड असणाऱ्यांचे असले तरी जाहिराती तयार करण्याचे नियोजन, त्याच्या कामाची विभागणी यापासून ते प्रत्यक्ष जाहिरात तयार करणाऱ्याच्या प्रक्रियेमधील अनेक संधी जाहिरात क्षेत्रातील उच्चपदस्थ अभिजीत करंदीकर यांनी उलगडल्या. तर तोंडी परीक्षांची शाळेकडून मिळणारी खैरात आणि ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ या पद्धतीमुळे दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे झाल्याचे मत करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी मांडले. विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन उत्तम करिअर करता येते हा गैरसमज असल्याचेही सांगितले. शेवटच्या सत्रात दत्तात्रय नेरकर, विनायक काटदरे, डॉ. निर्मलकुमार कुर्वे आणि रजनीकांत भट्ट यांनी नीट आणि जेईई परीक्षांचा अभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.