कांजूर महामार्गाजवळ मृतदेह सापडलेल्या इस्थर अनुह्या या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ अद्याप कायम आहे. तिच्या शरीरावर रसायन आढळले असून तिच्यावर हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 इस्थर अनुह्या  (२३) ही अभियंता तरुणी ५ जानेवारीपासून कुर्ला टर्मिनस स्थानकातून बेपत्ता होती. गुरूवारी संध्याकाळी तिचा मृतदेह कांजूर पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील मिठागराजवळच्या तिवरांच्या झुडपांजवळ आढळला. तिच्या मृतदेहावर द्रव पदार्थ टाकण्यात आल्याचे पोलिसांना आढळले. पेस्ट कंट्रोलच्या कामासाठी वापरला जाणारे हे द्रव्य आहे. तिच्या मृतदेहाजवळ तिची ओढणी आणि अंतर्वस्त्रे सापडली होती. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील अहवालासाठी नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष अद्याप जाहीर झाला नसला तरी तिच्यावर हत्येपूर्वी बलात्कार झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. परिसरातील टॅक्सी आणि रिक्षाचालकांची पुन्हा कसून तपासणी सुरू आहे.