मुंबई : निदान लवकर झालेल्या स्तनाच्या कर्करोगात रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी गाठीच्या आसपास सर्व बाजूने स्थानिक भूल दिल्यास त्याचे उत्तम परिणाम पाहायला मिळत असल्याचे संशोधनाअंती आढळून आले आहे. या पद्धतीमुळे कर्करोगाची गाठ पुन्हा येण्याचा धोकाही कमी होतो व मृत्यूचा धोकाही कमी झाल्याचे आढळून आले आहे.

गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत रुग्णांवर केलेल्या संशोधनावरील अभ्यासाचे निष्कर्ष टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी पॅरिस येथे झालेल्या वैद्यकीय परिषदेत सादर केले.

स्तनाच्या कर्करोगामध्ये शस्त्रक्रिया हा एक उपचारात्मक पर्याय आहे. शस्त्रक्रियेनंतर केमोथेरपी, हार्मोन थेरपी, रेडिओथेरपी अशा पुढील उपचारपद्धती पूर्ण केल्यानंतरही अनेकदा कर्करोगाची पुनरावृत्ती होण्याचा धोका असतो. त्यावर उपाय म्हणून टाटा मेमोरियल सेंटरने एक नवीन सोपी उपचारपद्धती अभ्यासातून सिद्ध केली आहे. गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर झालेल्या १६०० महिलांवर या पद्धतीचा प्रयोग करण्यात आला. त्यात ८०० महिलांवर या उपचारपद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली तर ८०० महिलांवर नियमित पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णांच्या प्रकृतीचा ११ वर्षे पाठपुरावा करून केलेल्या अभ्यासातून आशादायक निकाल पुढे आले आहेत. टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास पूर्ण झाला असून त्याचे निकाल बडवे यांनी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी वैद्यकीय परिषदेत सादर केले.

या अभ्यासामध्ये टाटा मेमोरियल सेंटरसह देशभरातील नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या आणखी दहा संस्था सहभागी झाल्या होत्या. यापुढे स्तनांच्या कर्करोगामध्ये याच पद्धतीने शस्त्रक्रिया केल्या जाव्यात यासाठी नियमावली तयार करण्यात येणार असल्याचेही बडवे यांनी सांगितले. शस्त्रक्रिया केल्यानंतर सहा वर्षांच्या पाठपुराव्यामध्ये रोगाची पुनरावृत्ती न झाल्याचे प्रमाण वाढले असल्याचे आढळून आले आहे.

नवीन उपचारपद्धती काय आहे ?

कर्करोगाच्या गाठींवरील शस्त्रक्रिया करीत असताना रुग्णाला भूल दिली जाते. मात्र या नव्या पद्धतीने संपूर्ण भूल देण्याबरोबरच गाठीच्या आसपास सर्व बाजूने इंजेक्शनने भूल देऊन गाठीतील पेशींचे विभाजन, हालचाल थांबवली जाते. भूलीचे इंजेक्शन दिल्यानंतर पाच मिनिटे वाट पाहून मग शस्त्रक्रिया केली जाते. हा छोटासा प्रयोग चांगला उपाय असल्याचे आढळून आले आहे. जागतिक स्तरावर हा अशा प्रकारचा पहिलाच अभ्यास आहे. या प्रयोगामुळे कर्करोग पुन्हा होण्याचे प्रमाण चार टक्क्यांनी कमी झाले आहे. तर मृत्यूचा धोकाही कमी झाला आहे.

खर्च १०० रुपयांपेक्षाही कमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नवीन पद्धतीमुळे शस्त्रक्रियेचा खर्च वाढण्याची शक्यता नाही. कारण भूल देण्याचे औषधच एका ठरावीक मात्रेत दिले जाते व ते कर्करोगाला प्रतिबंध म्हणून काम करते. त्यामुळे या पद्धतीचा खर्च हा अक्षरश: शंभर रुपयांच्या आत असल्याची माहिती डॉ. बडवे यांनी दिली. मात्र शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला बाकीचे उपचार मात्र घ्यावे लागतात.