मुलगा शाळेत न गेल्याचे समजल्याने संतप्त झालेल्या पित्याने रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत मुलगा जागीच ठार झाल्याची घटना अंबरनाथ येथील भीमनगर झोपडपट्टीत शनिवारी रात्री घडली. या प्रकरणाचा धसका घेऊन रविवारी आजीनेही प्राण सोडले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ पूर्व येथील भीमनगर झोपडपट्टीत राहणारा वाहनचालक अजीज खान (३६) यास शनिवारी रात्री घरी आल्यावर चौथ्या इयत्तेत शिकणारा मुलगा साजिद खान (१०) शाळेत न गेल्याचे समजले. त्यामुळे रागाच्या भरात त्याने त्यांस लाकडी दांडक्याने बेदम मारले. त्याने तो जागीच गतप्राण झाला. या प्रकरणी साजिदची आजी खांतुबी खान हिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध नातवाच्या खुनाबद्दल तक्रार दाखल केली. या घटनेचा ताण सहन न झाल्याने रविवारी तिनेही देहत्याग केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.