प्राणी न पाळण्याच्या कारणांमध्ये सर्वात पहिले असते, ते त्याच्या संगोपनामध्ये घरात अडकून जाण्याचे. काही दिवसांसाठी घराबाहेर जावे लागल्यास त्या प्राण्याची काळजी घ्यायची कुणी, त्याला खाऊ-न्हाऊ घालायचे कुणी आणि त्याच्यावर लक्ष ठेवायचे कुणी, या जाणिवेने आपली आवड थोपवून ठेवणारे प्राणिप्रेमी बरेच आहेत. या जाणिवा असल्या तरी हौसेला प्राधान्य देऊन प्राणी आणण्याचे प्रमाण कमी झाले नाही; पण या प्राणिपालकांसमोरही कधी अपरिहार्य समस्या येतात. सुट्टीत गावाला जायचे असते किंवा घरी समारंभ असतो, अचानक पाहुण्यांची वर्दळ वाढते. अशा वेळी नातेवाईक, आप्त-मित्रांच्या गोतावळ्यात विचारपूस करून काही दिवसांसाठी आपल्या पेट्सची व्यवस्था करण्याचा प्रघात अगदी अलीकडेपर्यंत होता. जागा, वेळेच्या गणितांमध्ये शेजाऱ्याच्या कुत्र्या-मांजरांची किंवा पक्ष्यांची थोडीफार काळजी घेणे शक्य होते. कालौघात जागेची आणि वेळेची गणिते, ‘शेजारी’ ही संकल्पना हे सगळेच बदलत गेले. प्राणी पाळण्याच्या संकल्पना आणि त्या अनुषंगाने पाळलेल्या प्राण्याच्या गरजाही बदलल्या आणि सुट्टय़ांमध्ये प्राण्यांची जबाबदारी कुणी उचलायची, असा प्रश्न पडू लागला. सुट्टय़ा आणि सणासुदीच्या गडबडीत घरातले ‘श्वानुले’ किंवा मांजरे, पक्षी यांची काळजी घेण्याची जबाबदारी ‘पेट बोर्डिग’ किंवा पेट हॉस्टेल्स उचलत आहेत.

जगात सर्वाधिक कुत्री पाळणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये भारत आहे. त्यामुळे वेगळी संकल्पना घेऊन उभी राहिलेली पेट हॉस्टेल्स ही फक्त एक सुविधा न राहता गरज बनू पाहत आहे. एखाद्या पंचतारांकित हॉटेलाप्रमाणे पाळीव प्राण्यांसाठी सुविधा देणारी हॉस्टेल्स, पाळणाघरे, बोर्डिग्सना प्राणिप्रेमींकडून मागणी वाढली आहे. मे महिना, दिवाळी, नाताळ आदी सणांमध्ये पेट बोर्डिगमध्ये आपला प्राणी ठेवण्यासाठी पशुपालकांची गर्दी होते. ‘पेट सव्‍‌र्हिस इंडस्ट्री’मधील पेट हॉस्टेल्सचा हा ट्रेंड इतका वाढला की, आता या बोर्डिगसाठीही किमान महिनाभर आधी नोंदणी करावी लागत आहे.

मांजरे आणि पक्ष्यांसाठीही..

मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणी अगदी १० ते १२ प्राण्यांपासून ते १०० प्राण्यांची एका वेळी उत्तम सोय करून देणारी पेट बोर्डिग्स आहेत. कुत्र्यांबरोबरच मांजरे आणि पक्ष्यांसाठीही हॉस्टेल्सच्या सुविधा उपलब्ध आहेत. कुत्र्याच्या प्रजातीनुसार त्याला ठेवण्याचे भाडे ठरते. साधारण ४०० रुपये दर दिवशी ते अगदी दोन हजार रुपये दर दिवशी मोजूनही प्राणिप्रेमी पेट हॉस्टेल्सकडे धाव घेत आहेत. ऑनलाइन, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून नोंदणीच्या सुविधाही आहेत. प्राण्यांना घरून नेणे आणि ठरलेल्या दिवशी आणून सोडण्याची सुविधाही काही हॉस्टेल्स करतात.

..पण ही काळजी घ्यावीच!

  • भारतात काही प्रमाणात पेट उद्योग अजूनही अनियंत्रितच आहे. ‘डॉग बोर्डिग’ सुरू करण्यासाठी फारशा परवानग्या घेण्याची आवश्यकता नाही आणि मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाणही जास्त असल्यामुळे हा व्यवसाय झपाटय़ाने वाढतो आहे. काही वेळा फसवणुकीचे अनुभवही प्राणिपालकांच्या गाठीशी येतात. त्यामुळे प्राण्यांना बोर्डिगमध्ये सोडण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक आहे.
  • बोर्डिगमध्ये स्वच्छता, सुरक्षा यांची खातरजमा करावी.
  • जीपीएस कॉलरसारख्या सुविधा असतील तर त्याला प्राधान्य द्यावे.
  • शुल्क आणि त्यामध्ये नेमक्या कोणत्या सुविधा दिल्या जातात याची माहिती घेणे आवश्यक आहे. काही ठिकाणी वेगळे खाणे, ग्रुमिंग, वाहतूक यांचे शुल्क आकारले जाते.
  • प्राण्याला फिरण्यासाठी पुरेशी जागा आहे याची खातरजमा करावी.
  • कोणते खाणे दिले जाते, ते आपल्या कुत्र्याला किंवा मांजराला चालते का याची माहिती घ्यावी.
  • अत्यावश्यक किंवा प्राथमिक उपचारांची सुविधा आहे का याची खातरजमा करावी.
  • प्राणी बोर्डिगमध्ये ठेवण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करून तो निरोगी असल्याची खातरजमा करावी.
  • प्राण्यांचे लसीकरण केलेले असावे.
  • पिसवा, गोचिड नाहीत याची खात्री करावी.
  • मांजरे एकत्र कुत्र्यांच्या पिंजऱ्यांपासून लांब ठेवण्यात येत आहेत त्याची खात्री करावी.
  • फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करता येऊ शकते.