डिसेंबर २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्यात दाखल करण्याचे उद्दिष्ट; महिलांसाठीही राखीव बस वाढवण्याचा निर्णय

मुंबई : पर्यावरणाचा विचार करून विजेवर धावणाऱ्या अधिकाधिक बसगाडय़ा ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय बेस्ट उपक्र माने घेतला आहे. त्यानुसार डिसेंबर २०२२ पर्यंत मुंबईत टप्प्याटप्प्याने विजेवर धावणाऱ्या आणखी दोन हजार बसगाडय़ा दाखल होतील, अशी माहिती बेस्ट महाव्यवस्थापक लोके श चंद्र यांनी दिली. बसची संख्या वाढताच महिलांसाठीही राखीव बस वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्राकडून विजेवर धावणाऱ्या बसगाडय़ांची योजना राबविली जात आहे. विजेवर धावणाऱ्या बससाठी कमी खर्च येतो, तसेच प्रदूषणही होत नसल्याने या बसगाडय़ा ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय बेस्ट उपक्र माने घेतला. आजघडीला स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील डिझेल, सीएनजीवर धावणाऱ्या बसबरोबरच २८८ विजेवरील बसही (सहा स्वमालकीच्या आणि २८२ भाडेतत्त्वावरील) बेस्टच्या ताफ्यात आहेत. याबाबत महाव्यवस्थापक लोके श चंद्र यांनी सीएनजी बसमागे प्रतिलिटर सरासरी १८ ते १९ रुपये, डिझेल बसमागे ३८ ते ३९ रुपये खर्च येतो. मात्र विद्युत बसमागे हाच खर्च नऊ रुपये असल्याचे सांगितले. खर्च कमी आणि पर्यावरणस्नेहीही असल्याने अधिकाधिक बस दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एक ते दोन महिन्यांत १०० विद्युतवरील बस येतील. या एकमजली बस असतील. त्यानंतर डिसेंबर २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्यांत आणखी एक हजार ९०० विद्युत बस दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती चंद्र यांनी दिली. यामध्ये वातानुकू लित आणि विनावातानुकू लित मोठय़ा एकमजली तसेच मिडी बसचा समावेश असेल. सध्या बेस्ट उपक्र माकडून महिलांसाठी तेजस्विनी बसगाडय़ा चालवण्यात येतात. शिवाय महिला प्रवाशांसाठी विशेष बस फे ऱ्याही होतात. यापुढे येणाऱ्या विद्युत बसची संख्या पाहता महिला विशेष बसगाडय़ांची संख्याही वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

सीएनजीत रूपांतर

बेस्टच्या ताफ्यात सध्या तीन हजार २९६ बस असून यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचा समावेश आहे. डिझेलवरील २९५ स्वमालकीच्या आणि ५५५ भाडेतत्त्वावरील, सीएनजीवरील एक हजार ६९० स्वमालकीच्या बस आणि ५०० भाडेतत्त्वावरील, तर विजेवरील भाडेतत्त्वाच्या २८२ बस आणि स्वमालकीच्या सहा बस आहेत. डिझेलच्या वाढत जाणाऱ्या किमतींमुळे खर्च कमी करण्यासाठी डिझेलवरील स्वमालकीच्या बसही सीएनजीमध्ये रूपांतरित करण्यात येत असल्याचे महाव्यवस्थापकांनी सांगितले.

बेस्ट ताफा वाढणार

बेस्टकडून विद्युतवर धावणाऱ्या बसगाडय़ा दाखल करताना यात एकमजली बसबरोबरच दुमजली बसचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांची संख्याही १०० पेक्षा अधिक आहे. याशिवाय साध्या ४०० बस येत्या डिसेंबर महिन्यापर्यंतही टप्प्याटप्प्यात दाखल होतील. बेस्टच्या ताफ्यात सध्या स्वमालकीच्या ४८ दुमजली बस, एकमजली १,४७७ बस आणि मिडी ४६० आणि विद्युतवर धावणाऱ्या सहा बस आहेत. उर्वरित बस या भाडेतत्त्वावरील आहेत.

फेऱ्यांमध्ये वाढ

बसची कमी संख्या, त्यातच वाहतूक कोंडी, तांत्रिक बिघाड या कारणांमुळे प्रवाशांना बस वेळेत उपलब्ध होत नाहीत. प्रवाशांना दर दहा ते पंधरा मिनिटांनी बस उपलब्ध व्हावी यासाठी बेस्टने नियोजन सुरू केले आहे. बसची संख्या हळूहळू वाढत असून येत्या काही महिन्यांत त्यात आणखी वाढ होईल. त्यामुळे बस वेळेत उपलब्ध होतील. प्रवासी संख्येतही काहीशी वाढ होत आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या बस सेवांमध्येही वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे महाव्यवस्थापक  लोकेश चंद्र म्हणाले.