मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी गावदेवी पोलिसांनी अजीत मगरे नावाच्या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. मगर याच्यावर हल्ल्याच्या कटात महत्वपूर्ण सहभाग असल्याचा आरोप आहे.    याप्रकरणातील अटक आरोपींची आकडा ११७ झाला आहे. दरम्यान, न्यायालयाने मगर याच्यासह यापूर्वी अटक करण्यात आलेलाआरोपी संदीप गोडबोले यांना १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी ८ एप्रिलला दुपारी साडेतीनच्या सुमारास एसटी कर्मचार्यानी दगड आणि चपला फेकल्या होत्या. पोलिसांनी शनिवारी अजीत मगरे नावाच्या आरोपीला अटक केली.  मगर याच्यासह यापूर्वी अटक केलेल्या पत्रकार चंद्रकांत सुर्यवंशी, अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकिलांनी, मगरे हा हल्ल्याच्या कटात सहभागी होता. त्यामुळे त्याच्या कोठडीची मागणी केली तर, गोडबोले हा खास हल्ल्यासाठी नागपूरहून मुंबईत आला होता. तो ७ एप्रिलच्या बैठकीला हजर होता, असे न्यायालयाला सांगण्यात आले.

 सरकारी पक्षाची मागणी मान्य करून मगरे आणि गोडबोले यांच्या पोलीस कोठडीत १९ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. अटक आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कर्मचार्याकडून घेतले असल्याचा आरोप नाकारला. मात्र सदावर्ते यांनी अर्ज तयार केले आणि पैसे गोळा करायला लावले. सदावर्ते आणि गोडबोले यात सहभागी आहेत असे पाटील याने सांगितले. पत्रकार चंद्रकांत सुर्यवंशी याने देखील आम्ही काही केले नाही. सर्व काही सदावर्ते यांनी केले, असा दावा केला.

दरम्यान, गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. पोलिसांतर्फे सरकारी वकिलांनी त्यांच्या जामीनाला जोरदार विरोध केला. त्यानंतर न्यायालयाने अ‍ॅड. सदावर्ते यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या १११ आरोपींसाठी सोमवारी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केले जाणार आहेत.

पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे करण्यात आलेल्या दाव्यानुसार, याप्रकरणी अर्ज तयार करून २५० आगारांमधून पैसे गोळा करण्यात आले. मात्र कर्मचाऱ्यांकडून गोळा करण्यात आलेल्या पैशांतून सदावर्ते यांनी काही मालमत्ता आणि मोटारी खरेदी केल्याचा संशय आहे. त्यामुळे याबाबत तपास झाल्यानंतर सदावर्ते यांची देखील कोठडी आम्हाला लागेल यात शंका नाही, असे सरकारी वकिलांनी सांगितले. पैसे गोळा केले म्हणजे खंडणी मागितली नव्हती. हा आरोप चुकीचा आहे, असा दावा यावेळी सदावर्ते यांच्या बाजूने करण्यात आला.