मुंबई विद्यापीठाच्या निम्म्याहून अधिक महाविद्यालयांना प्राचार्यच नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे मागील ४-५ वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. पण यावर तोडगा काढण्यात विद्यापीठ आणि महाविद्यालयांना अद्याप यश आलेले नाही. प्राचार्याच्या नियुक्तीच्या सहाव्या वेतन आयोगानुसार बदललेल्या निकषांमुळे तर ही अडचण अधिकच वाढली आहे.
सहाव्या वेतन आयोगानुसार प्राचार्य पदासाठीचा उमेदवार हा सहयोगी प्राध्यापक किंवा प्राध्यापक या पदावर काम करणारा असणे आवश्यक आहे. त्याला १५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असून त्याचे विद्वत सादरीकरण मूल्यांकन (एपीआय) ४०० असणेही आवश्यक आहे. एपीआयमध्ये उमेदवाराचा शिकविण्याची पद्धती, त्याचा एनसीसी, एनएसएस, सांस्कृतिक अशा विविध समित्यांमधील सक्रिय सहभाग आणि संशोधनाचे काम यामध्ये प्रबंधांचे सादरीकरण, पुस्तक अशा बाबींचा विचार केला जातो. यावरून उमेदवाराचा एपीआय ठरविला जातो. यापूर्वी प्राचार्य पदासाठीच्या उमेदवाराला अनुभवाची अट १० वष्रे इतकी होती. तसेच साहाय्यक प्राध्यापकही या पदासाठी अर्ज करू शकत होता. आता या अटी बदलल्यामुळे त्यांची पूर्तता करणारे प्राध्यापक फार कमी आहेत. जे प्राध्यापक यासाठी पात्र आहेत त्यांच्या आणि प्राचार्यपदाच्या पगारामध्ये केवळ एक हजार रुपयांचीच वाढ आहे. यामुळे निव्वळ एक हजार रुपयांसाठी कुणीही प्राचार्य होऊन आपले संशोधनाचे काम सोडून प्रशासकीय कामात अडकवून घेण्यास तयार होत नाहीत.
विद्यापीठाच्या सुमारे ७०० महाविद्यालयांपकी ४०५ महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राचार्यच उपलब्ध नाहीत. यातील केवळ १२ महाविद्यालयांनी प्रभारी प्राचार्याची नेमणूक केली आहे. उर्वरित ३९३ महाविद्यालयांपैकी ३४८ महाविद्यालये विनाअनुदानित आहेत तर २९ महाविद्यालये अनुदानित आहेत. सात शासकीय तर एक केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाविद्यालयाचाही यात समावेश आहे. एक स्वायत्त आणि एका संस्थात्मक महाविद्यालयाचाही समावेश आहे.
अधिसभा सदस्य डॉ. विजय पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विद्यापीठाने ही माहिती दिली आहे.
या संदर्भात शासनाला पत्रही देण्यात आले असून प्राचार्यपदासाठीचा अनुभव १० वर्षांचा करावा तसेच साहाय्यक प्राध्यापकांनाही यासाठी अर्ज करता यावा, जेणेकरून पगार वाढेल या आशेने तरी प्राचार्य पदासाठी इच्छुकांची संख्या वाढेल अशी मागणी शिक्षकांच्या ‘मुप्टा’ या संघटनेतर्फे करण्यात आल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
दरम्यान, ज्या महाविद्यालयांनी प्राचार्याची नियुक्ती केलेली नाही त्यांना एका परिपत्रकाद्वारे लवकरात लवकर नियुक्त करण्याचे आदेश दिले जातील, असे आश्वासन प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी दिले आहे.