फोडणीत पडण्याआधीच कढीपत्त्याची तडतड!

‘‘दर हिवाळ्यात काही दिवसांसाठी कढीपत्त्याची आवक घटते आणि तो महागतो.

 

आंध्र प्रदेशातून आवक घटल्याने किलोमागे तिप्पट वाढ; ग्राहकांना मोफत देताना विक्रेत्यांचा हात आखडता

मुंबई : प्रत्येक पदार्थाची फोडणी तडतडवणारा आणि त्यातून पदार्थाचा खमंगपणा वाढवणारा कढीपत्ताच महागाईमुळे तडतडू लागला आहे. एरवी हिरव्या मसाला किंवा भाजीच्या एखाद्या पेंढीसोबतही ग्राहकांना सढळ हस्ते कढीपत्ता देणारे किरकोळ विक्रेते आता कढीपत्त्याची एखादी काडी ग्राहकाच्या पिशवीत टाकतानाही कांकू करू लागले आहेत. आंध्र प्रदेशातून होणारी कढीपत्त्याची आवक घसरल्याने घाऊक बाजारात ३० रुपये किलोने मिळणारा कढीपत्ता ८० ते १०० रुपये किलो दराने विकला जात आहे.

आंध्र प्रदेशमधून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), दादर, भायखळा, कल्याण, ठाणे आदी ठिकाणच्या घाऊक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर कढीपत्त्याची आवक होते. एकट्या मुंबईला दररोज सुमारे २० ते २५ टन कढीपत्ता लागतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेशातून येणाऱ्या कढीपत्त्याची आवक घसरली आहे. त्याचबरोबर पुणे आणि राज्यातील अन्य भागांतून येणाऱ्या कढीपत्त्याचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळे कढीपत्त्याच्या दरांनी उसळी घेतल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रत्येक पदार्थाच्या फोडणीत कढीपत्त्याला महत्त्व असले तरी, मुबलक उपलब्धता आणि स्वस्त दर यामुळे बाजारात ग्राहकांना तो अक्षरश: मोफत दिला जातो. मिरची, कोथिंबीर, आले घेणाऱ्या ग्राहकांना विक्रेते न मागता कढीपत्ता देतात. तसेच भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी मागणी केल्यास त्यांच्या पिशवीतही सढळ हस्ते कढीपत्ता टाकण्यात येतो. मात्र, दर वाढल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी आता हात आखडता घेतला आहे. विक्रेतेही कढीपत्त्याचे पैसे ग्राहकांकडून घेऊ लागले आहेत.

‘‘दर हिवाळ्यात काही दिवसांसाठी कढीपत्त्याची आवक घटते आणि तो महागतो. गेल्या वर्षी कढीपत्त्याचा दर प्रतिकिलो ४० रुपयांवर गेला होता; पण यंदा झालेली भाववाढ सर्वाधिक आहे,’’ असा दावा घाऊक विक्रेते गणेश पावगे यांनी के ला.

टाळेबंदीचा फटका

टाळेबंदीत वेळच्या वेळी कापणी न झाल्याने आंध्र प्रदेशातील बरीचशी शेती उद्ध्वस्त झाली. शिवाय टाळेबंदीनंतरही अनेक निर्बंध कायम राहिल्याने कढीपत्ता मुंबई, महाराष्ट्रात आणण्यापेक्षा स्थानिक बाजारपेठेत किंवा दक्षिणेतील अन्य राज्यात विकणे आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना अधिक सोयीचे झाले. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात भाजी पुरवणाऱ्या सर्वच बाजारपेठांमधील कढीपत्त्याची आवक रोडावली आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Apmc market curry leaves due to inflation food dish akp