भाजपला परवानगी दिल्याने राष्ट्रवादीचा स्थानिक नेता न्यायालयात

मुंबई : भाजपच्या स्थानिक नेत्याला घाटकोपर येथील मैदानावर छट पूजा आयोजित करण्यास परवानगी देण्याच्या महानगरपालिकेच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देऊन सुट्टीकालीन न्यायालयाकडे दाद मागण्याची सूचना न्यायालयाने याचिकाकर्त्याला केली.

दुर्गा परमेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने ही याचिका केली होती. भाजपच्या स्थानिक नेत्याने मैदानावरील छट पूजा आयोजनासाठी अर्ज केला नव्हता. परंतु त्याने लिहिलेल्या पत्राच्या आधारे महानगरपालिकेने त्याला परवानगी दिल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. वाहतूक आणि अग्निशमन दलाने कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. असे असतानाही मुंबई पोलिसांनी मात्र आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला.

याचिकेत इतर मंडळाला दिलेली परवानगी रद्द करण्याची आणि त्याऐवजी आपल्या मंडळाला छट पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने मात्र याचिकाकर्त्यांना तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला. तसेच त्यांना सुट्टीकालीन न्यायालयासमोर याचिका सादर करण्याची सूचना केली.

प्रकरण काय ?

याचिकाकर्त्यांनी छट पूजेसाठी कृत्रिम तलाव बांधण्यासाठी मैदानावर धार्मिक मेळावे घेण्यास परवानगी मागितली होती. राष्ट्रवादीच्या नेत्याच्या प्रभागातील रहिवाशांना यापूर्वीही धार्मिक कार्यक्रमांसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आताही ही परवानगी मिळणे अपेक्षित होते, मात्र महानगरपालिकेने अन्य मंडळाला या मैदानावर छटपूजा आयोजित करण्याची परवानगी दिल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले. १९ ऑक्टोबर रोजी आपल्याला महानगरपालिकेकडून एक पत्र आल्याचे आणि त्यात परवानगी रद्द करण्यात आल्याचे म्हटले होते, याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.