मुंबई: एसटीच्या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या निकालानंतर केलेला जल्लोष आणि नंतरचे तीव्र आंदोलन या परस्परविरोधी घटनांमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करावे या मागणीवर आम्ही ठाम आहोत. ही मागणी मान्य झाली नाही. शिवाय आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचाही सहानुभूतीपुर्वक विचार केला नाही. त्याचा निषेध म्हणून तीव्र आंदोलन केल्याची भावना काही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. 

 न्यायालयाच्या गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर कारवाया मागे घेण्याच्या सूचना, निवृत्ती वेतन आणि न्यायालयाने अन्य सूचना केल्या आणि आझाद मैदानात उपस्थित हजारो कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला होता. त्यानंतर शुक्रवारी सिल्वर ओकवर कर्मचाऱ्यांकडून शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला.  या आंदोलनात लातूर विभागाचे वाहतुक निरीक्षक अभिषेक पाटील सहभागी होते. आधी जल्लोष आणि नंतर तीव्र आंदोलन याबाबत पाटील यांना विचारले असता, गुरुवारी कारवाया मागे घेण्यात याव्यात यांसह अन्य सूचना न्यायालयाने दिल्याने त्याचा आनंद कर्मचाऱ्यांनी साजरा केला. मात्र विलीनीकरण, सातवा वेतन आयोग, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांचा सहानुभूतीपुर्वक विचार राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांनी केला नाही. त्यासाठी आझाद मैदानात आलेल्या कर्मचाऱ्यांची येऊन विचारपूसही केली नाही, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तीव्र आंदोलन केल्याचे सांगितले. औरंगाबाद विभागातील एसटीच्या वाहक वैशाली पाटील याही या हल्ल्यात सामिल होत्या. त्यांनी कारवाया मागे घेण्यात आल्याने आम्ही गुरुवारी आझाद मैदानात जल्लोष केल्याचे सांगितले.