‘आजचे वर्तमानपत्र ही उद्याची रद्दी असते, त्यामुळे वर्तमानपत्रीय लेखनाला साहित्यमूल्य नसते’, असे जेव्हा साहित्यविश्वात काहीशा कुचेष्टेने बोलले जात होते, तेव्हा मराठी वर्तमानपत्राचा ढाचा आमूलाग्र बदलून वर्तमानपत्रीय लेखनाला साहित्यमूल्य देणारे प्रयोगशील संपादक म्हणून डॉ. अरूण टिकेकर यांचे नाव आघाडीवर राहिले. ‘लोकसत्ता’चे संपादक म्हणून त्यांनी केलेल्या पत्रकारितेमुळे मराठी पत्रकारविश्वाला नवा आयाम मिळाला. केवळ एक अग्रलेख आणि संपादकीय पानांवरील नैमित्तिक लेखांची जागा सोडली, तर वर्तमानपत्रातील बाकीच्या जागेवर केवळ बातम्यांचा भरणा करून वर्तमानपत्र सजविणे म्हणजे पत्रकारिता हा समज मराठीत काही वर्तमानपत्रांमुळे दृढ होऊ लागला असतानाच, लोकसत्ताचा प्रत्येक अंक नवनव्या मजकुराने आणि वाचकप्रिय विषयांचा परामर्श घेणाऱ्या पुरवण्यांनी संपन्न करण्याचा धाडसी प्रयोग करणारा व्यासंगी पत्रकार ही डॉ. टिकेकर यांची ओळख बनली. टाइम्स ऑफ इंडियाच्या संदर्भ विभागाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी पत्रकाराला आवश्यक असलेल्या सर्व संदर्भाचा खजिना अभ्यासपूर्वक स्वतकडे जमा केला आणि तो जोपासला, त्यामुळे, माहितीचा संपन्न स्रोत म्हणून त्यांना मराठीच नव्हे, तर इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीनेही मान्यता दिली. या खजिन्याचा उपयोग त्यांनी पत्रकारितेच्या विश्वात केला आणि ‘लोकसत्ता’ व त्यानंतरही जेथेजेथे संपादकीय जबाबदारी पेलली तेथेतेथे तो वाचकांसाठी रिता करत राहिले.

पुण्यामुंबईसारख्या शहरांचा इतिहास हा डॉ. टिकेकर यांच्या विशेष आवडीचा विषय. त्यावर त्यांनी विपुल लेखन केले. ‘लोकसत्ता’ हे केवळ बातमीपत्र नव्हे, तर वाचकाला सर्वागांनी संपन्न करणारा माहितीचा आणि मनोरंजनाचाही स्रोत असला पाहिजे, त्यासाठी वर्तमानपत्राच्या वाचकाची अभिरुची वाढविली पाहिजे, अशा जाणिवेतून ‘लोकसत्ता’च्या विविध साप्ताहिक पुरवण्यांना नवे रूप देण्याच्या त्यांच्या प्रयोगामुळे मराठी वर्तमानपत्रसृष्टीलाच एक नवी दृष्टी मिळाली आणि मराठी वर्तमानपत्रासोबतच्या पुरवण्या हा रसिक वाचकांचा आवडीचा व चर्चेचा विषय झाला. मुंबई महानगर हे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक चळवळींचे केंद्रस्थान असल्याने समाजजीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक विषयाचा परामर्श ‘लोकसत्ता’ने घेतलाच पाहिजे, असा त्यांचा कायम आग्रह असायचा. त्या दृष्टीनेच ‘लोकसत्ता’च्या रविवार पुरवणीचा ढाचा तर त्यांनी अभ्यासपूर्वक बदललाच, पण शनिवारची चतुरंग पुरवणीदेखील अधिकाधिक वाचकप्रिय बनविण्याचा चंग बांधून तो यशस्वीही केला. वर्तमानपत्राच्या वाचकाला साहित्यिक व सांस्कृतिक मेजवानीचे एखादे ताट आठवडय़ातून एकदा तरी मिळाले पाहिजे, त्याची साहित्यिक भूक वर्तमानपत्राच्या वाचनातूनही भागली पाहिजे, या हेतूने ‘लोकसत्ता’च्या अंकासोबत हास्यरंग, बालरंग, लोकमुद्रा, चतुरा आदी नव्या पुरवण्यांची कल्पनाही त्यांनी यशस्वीपणे राबविली. केवळ संध्याकाळचा विरंगुळा म्हणून वर्तमानपत्राच्या बातम्यांवर चर्चा करण्याची सवय असलेल्या वाचकास नवनवे ज्ञानही वर्तमानपत्रातूनच मिळाले पाहिजे, या हेतूने लोकसत्तामध्ये ‘गाथा’ नावाचा एक आगळा दैनंदिन उपक्रम डॉ. टिकेकरांनी सुरू केला. गाथा बलिदानाची, गाथा वैज्ञानिकांची अशा काही भागांमुळे शालेय विद्यार्थ्यांनी या गाथेच्या चिकटवह्य़ा करून स्वतची संदर्भपुस्तके तयार केली. या गाथा स्पर्धेला वाचकांचा व शाळांचाही भरभरून प्रतिसाद मिळाला. लोकसत्ताचे वाचन ही वाचकांची सवय होऊन गेली.

Freedom of press, right to dignity,
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय
Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

आफाट ग्रंथप्रेम

पत्रकारितेच्या विश्वात वेगळ्याच वाटेने प्रवेश करणारा हा संपादक केवळ बातमीदारीत अडकून राहिला नाही. वर्तमानपत्राला नवा चेहरा देण्याचा वेगळा प्रयोग करणारा, व्यावसायिक नीती आणि वर्तमानपत्रीय व्यवस्थेला वेगळे वळण देणारा व्यवस्थापक म्हणूनही टिकेकर यांचे योगदान राहिले. या सर्वागीण अनुभवामुळेच, लोकसत्तानंतरही लोकमत, सकाळ आदी वृत्तपत्र समूहांमधील संपादकीय जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि समर्थपणे पेलल्या. टिकेकरांचे ग्रंथप्रेम हा वृत्तपत्रसृष्टीचा औत्सुक्याचा विषय होता. संपादक म्हणून तात्कालिक मजकुरापुरतीच बांधिलकी न ठेवता त्यांनी ग्रंथप्रमेही जपले. अफाट वाचन करणाऱ्या या संपादकाने चर्चा, भाषणे, वैचारिक लेखन यांमध्ये निवृत्तीच्या काळात वाहून घेतले. मुंबई आणि महाराष्ट्राचे वैभव मानल्या जाणाऱ्या एशियाटिक लायब्ररीचे अध्यक्षपदही त्यांनी ग्रंथप्रेमापोटीच सांभाळले आणि एशियाटिकच्या वैभवाला नवी झळाळी दिली.  एक चतुरस्र लेखक, व्यासंगी पत्रकार, अभ्यासू वक्ता, चिकित्सक संशोधक, उत्तम वाचक अशी अनेक रूपे एकत्र असलेले अरूण टिकेकर हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचा एक आगळा चेहरा ठरले..

पुरवण्यांचा प्रयोग

पुरवण्यांचा अनोखा प्रयोग करून वाचकास साहित्यमूल्य असलेल्या मजकुराचा आनंद देणारे व साहित्य, कला, संस्कृतीचा चौफेर आढावा घेणारे वर्तमानपत्र म्हणून ‘लोकसत्ता’ने मराठी वृत्तपत्रसृष्टीला एक नवी दिशा दिली, त्याचे श्रेय डॉ. टिकेकर यांचेच! मराठीतील दर्जेदार नियतकालिके वाचकांच्या निरुत्साहामुळे अस्तित्वाच्या उंबरठय़ावर उभे राहून जगण्याची धडपड करू लागली असताना, या परिस्थितीमुळे निर्माण होऊ घातलेली पोकळी भरून काढण्याचे काम आपण केले पाहिजे, या धाडसी जाणिवेतून अरूण टिकेकर यांनी ‘लोकसत्ता’च्या विविधांगी पुरवण्यांचा घाट घातला, आणि ‘लोकसत्ता’ हा महाराष्ट्राचा अभिमानबिंदू बनला. शहराभिमुख बातम्या, शहरांची संस्कृती, सामाजिक जडणघडण आणि आपल्या शहराबद्दल वाचकांना असलेला जिव्हाळा जपण्यासाठी, शहरांशी नाळ जोडणारी ‘वृत्तान्त’ नावाची पुरवणी सुरू करण्याची कल्पनाही त्यांच्याच प्रयोगशीलतेतून जन्मली, आणि मुंबई वृत्तान्त, पुणे वृत्तान्त आदी वेगळेपणाने सजलेल्या शहराभिमुख बातम्यांचा एक वेगळा नजराणा लोकसत्ताच्या वाचकांना मिळू लागला. मराठी वाचकाशी अर्थव्यवहाराचे नाते फारच त्रोटक असल्याची खंत त्यांना नेहमीच सतावत असे. मराठी वाचक हा गुंतवणूकदार बनला पाहिजे, अर्थनीतीशी त्याचे नाते जडले पाहिजे, या हेतूने मराठी वर्तमानपत्रातच अर्थव्यवहारविषयक पान सुरू करण्याचा पहिला मान त्यांनी लोकसत्ताला मिळवून दिला, आणि ‘अर्थ वृत्तान्त’ नावाची स्वतंत्र पुरवणी लोकसत्तासोबत  वाचकाची अर्थविषयक उत्सुकता शमवू लागली.

ग्रंथसंपदा

तारतम्य, जन-मन, अक्षरनिष्ठांची मांदियाळी, काल मीमांसा, फास्ट फॉरवर्ड (शरद पवार यांच्या भाषणांचे आणि मुलाखतींचे संपादन), मुक्तानंद- प्रा. श्रीराम पुजारी स्मृतिग्रंथ, रानडे- प्रबोधन पुरुष, शिखर शिंगणापूरचा श्री शंभू महादेव, स्थल-काल, ऐसा ज्ञानगुरू, बखर मुंबई विद्यापीठाची.

पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणेचा केशवराव विचारे पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणेचा स.मा. गर्गे पुरस्कार, प्राचार्य नानासाहेब नारळीकर विद्वत् पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार, श्रीमती सुशीलादेवी देशमुख ‘एकमत’ पुरस्कार, अनंतराव भालेराव पत्रकारिता पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा पत्रकारिता पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा ‘भ्रमंती’ पुरस्कार, ‘सह्य़ाद्री’ नवरत्न जीवनगौरव पुरस्कार.