मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न मुंबईमध्ये करण्यात आला. मनसेने घेतलेल्या पवित्र्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली. दरम्यान, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी व त्यांच्या चालकाविरोधात शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ प्रसिद्धी माध्यमांशी बोलत असताना मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.  या दरम्यान झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाली, मात्र सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संतोष धुरी, संदीप देशपांडे व त्यांच्या चालकाविरोधात शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, भरधाव वेगाने गाडी चालवणे, कृत्यामुळे एखाद्याला दुखापत झाल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून सर्वधर्मीयांची बैठक: मुंबई पोलिसांनी शहरातील विविध धर्माच्या शंभरहून अधिक प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ध्वनिक्षेपकाचा वापर व आवाजाच्या क्षमतेबाबत परवानगी घेण्यास सांगितले. प्रामुख्याने मंदिरे, गुरुद्वारा आणि चर्चच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आणि राजकारण्यांनी धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी मागणी या वेळी त्यांच्याकडून करण्यात आली. मुंबईतील एक हजार ४० मशिदींपैकी सुमारे ९५० मशिदींनी भोंगे लावण्यासाठी परवानगी घेतली. शहरात सुमारे दोन हजार ४०० मंदिरे असून त्यापैकी २४ मंदिरांनी आतापर्यंत परवानगी घेतल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.