मुंबई : चित्रकार, कलासमीक्षक व कलेतिहासाच्या अध्यापक नलिनी भागवत यांचे गुरुवारी सकाळी कोल्हापूर येथील राहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कलेतिहासाच्या संशोधनाची सोयच महाराष्ट्रात नसताना, बडोदे येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठातून त्यांनी ‘पश्चिम भारतातील आधुनिक कलाप्रवाह’ या विषयात पीएच.डी. मिळवली होती. कोल्हापुरात शालेय शिक्षण आणि तेथीलच गुरुवर्य दत्तोबा दळवी यांच्या काळात दळवीज आर्ट इन्स्टिटय़ूटमधून त्या वेळचा गव्हर्न्मेंट डिप्लोमा करून त्या मुंबईत आल्या. आर्ट टीचर्स डिप्लोमाही त्यांनी केला. मुंबईच्या ज. जी. कला महाविद्यालयातच, १९७२ पासून त्या कलेतिहास शिकवू लागल्या आणि १९९५ मध्ये निवृत्त झाल्या. जवळपास दोन प्ढिय़ांतील चित्रकारांना त्यांनी कलेचा इतिहास शिकवला. कोल्हापुरातील गणपतराव वडणगेकर, बाबुराव पेंटर , रवीन्द्र मेस्त्री ही परंपरा त्यांनी जवळून पाहिली होतीच, पण मुंबईच्या ‘प्रोग्रेसिव्ह ग्रुप’चाही विशेष अभ्यास केला होता.
निवृत्तीनंतर ‘लोकसत्ता’मध्ये त्या साप्ताहिक सदरातील कलासमीक्षा लिहीत. काही काळ मुंबईच्या ‘राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालया’मध्ये त्यांनी मानद पदावर काम केले. धातूवरील मीनाकारीचा (एनॅमिलग) छंद त्यांनी उतारवयातही जपला आणि या दुर्लक्षित कलेचा प्रसार केला. प्रदीर्घ आणि विविध प्रकारे केलेल्या या कला सेवेबद्दल त्यांना सन २०१५ मध्ये ‘राज्य कला प्रदर्शना’त महाराष्ट्र शासनातर्फे गौरविण्यात आले होते. नाशिकच्या वा. गो. कुलकर्णी कलानिकेतन महाविद्यालय आणि कोल्हापुरातील रंगबहार या संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाले होते.