शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावरील उर्वरित सुनावणी आता २७ ऑक्टोबरला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी बुधवारी दुपारी अडीच वाजता निश्चित केली आहे. आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टात आपली बाजू मांडली आहे. त्यांच्यानंतर अमित देसाई अरबाज मर्चंटच्या जामिनाच्या बाजूने युक्तिवाद करत होते. तुम्हाला किती वेळ लागेल, अशी विचारणा कोर्टाने केली. अमित देसाई यांनी ४५ मिनिटे उत्तर दिले तर एनसीबीच्या वतीने अनिल सिंग यांनी ४५ मिनिटे सांगितले. त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्यन खानच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात शपथपत्र दाखल केले असून आर्यनचा प्रभाकर साईल किंवा किरण गोसावी यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे न्यायालयाला सांगितले. समीर वानखेडे आणि इतर यांच्यात सुरू असलेल्या आरोपांशी अर्जदाराचा काहीही संबंध नाही, असे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्रभाकर साईलचे प्रतिज्ञापत्र प्रसारित करणारी माध्यमे दाखवत आहेत की आर्यन खान तपास रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे असे एनसीबीने म्हटले आहे. मात्र आर्यन खानने आपल्या लेखी प्रतिज्ञापत्रामध्ये एनसीबीचे आरोप नाकारले आहेत. “एनसीबी मुंबईचे प्रादेशिक संचालक आणि काही राजकीय व्यक्ती यांच्यात सध्या सोशल मीडियावर होत असलेल्या आरोप आणि प्रतिआरोपांशी अर्जदाराचा काहीही संबंध नाही. अर्जदाराचा खटल्यातील कोणत्याही व्यक्तीशी काहीही संबंध नाही,” असे त्यात आर्यनने म्हटले आहे.

आर्यन खानची अटक बेकायदेशीर – मुकुल रोहतगी

आर्यनचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, आर्यन तिथे फक्त पाहुणे म्हणून गेला होता. आर्यन खानकडून कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेल नाहीत. त्याची कोणतीही वैद्यकीय चाचणीही झालेली नाही. ज्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत ते विरोधी झाले आहेत. आर्यनला प्रतीक गाबा यांनी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. क्रूझमध्ये चढण्यापूर्वी आर्यनला ताब्यात घेण्यात आले.

मुकुल रोहतगी म्हणाले की, अरबाजकडे ड्रग्ज आहे की नाही, याचा अर्थ असा नाही की तो जाणीवपूर्वक ताब्यात आहे. ही केस फक्त सहा ग्रॅमची होती, म्हणजे लहान प्रमाणात. आर्यन खानला खोटेपणाने गोवण्यात आले आहे.

एनसीबीने एनडीपीएस कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत आर्यनचा जबाब नोंदवला होता, जो दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला होता. आर्यनला कटाखाली अटक करण्यात आली आहे, असे मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले

व्हॉट्सअॅप चॅट्सचा संदर्भ देत आर्यनच्या वकिलांनी सांगितले की, एनसीबीला क्रूझ पार्टीशी संबंधित कोणतेही चॅट मिळालेले नाहीत. गाबाने आर्यनला फोन केला होता, म्हणून तो त्याचा मित्र अरबाजसोबत गेला होता. जप्त करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.

समीर वानखेडेंवर उपस्थित केले प्रश्न

कोर्टरूममध्ये मुकुल रोहतगी यांनी समीर वानखेडे यांच्यावर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, ‘समीर वानखेडे काल म्हणाले होते की, राजकीय व्यक्तीशी वैर असल्याने हे घडत आहे, पण आज ते म्हणतात की आर्यनचाही यात सहभाग आहे. आर्यनकडून कोणतीही वसुली झालेली नाही. अरबाजनेही त्याच्याकडे ड्रग्ज नसल्याचे सांगितले आहे.

“आर्यन खानचा अन्य २० आरोपींशी कोणताही संबंध नाही. अरबाज व्यतिरिक्त माझ्या अशिलाचा आणि इतर २० आरोपींचा कोणताही संबंध नव्हता. व्हॉट्सअॅप चॅटचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. एनसीबी सांगत आहे की आर्यन ड्रग्जचा वापर करायचा, त्याचे परदेशातील लोकांशी संपर्क होते. या सर्व गोष्टी न्यायालयात सिद्ध कराव्या लागतील,” असे रोहतगी म्हणाले.

आर्यन-अचितच्या चॅटवर वकिलांचे स्पष्टीकरण

आपला युक्तिवाद सादर करताना मुकुल रोहतगी यांनी आर्यन आणि अचित यांच्यातील चॅटचाही संदर्भ दिला. आपला युक्तिवाद मांडताना मुकुल रोहतगी म्हणाले की, “आर्यन आणि अचित यांच्यात काही महिन्यांपूर्वी चॅट झाले होते. पण ते एका गेमबद्दल होते. हे पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने चित्रित केले आहे. हे चॅट १२ महिन्यापूर्वी आहे. सर्व मुले खेळ खेळत होती.”

आर्यन खानला आजही जामीन नाही

आरोपी आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने उद्यापर्यंत तहकूब केली आहे. उद्या दुपारी अडीच वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान, आर्यन खानच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली असून अरबाज मर्चंटच्या अर्जावर सुनावणी अर्धी झाली आहे

आर्यन खानला जामीन न मिळाल्यास अडचणी वाढणार आहेत. न्यायालय शुक्रवार, २९ ऑक्टोबरपर्यंत खुले राहणार आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवारी सुट्टी असेल. त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होतील. खटला दाखल करण्याचे काम शनिवारी न्यायालयात होत असले, तरी न्यायाधीशांनी निर्णय दिल्यास सुनावणीचा निर्णय घेता येईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aryan khan bail hearing updates 26th october 2021 aryan khan bail order today latest update mumbai drug bust news abn
First published on: 26-10-2021 at 14:22 IST