केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी रविवारी अटक केली होती. यानंतर कालच आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज आर्यनसह इतर सात आरोपींना मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यामुळे आर्यनला जेल होणार की बेल मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर याबाबत न्यायालयाने निर्णय दिला. त्यानुसार आर्यन खानबरोबरच मुनमुन धमेच्या व अरबाज सेठ मर्चंट या दोघांना देखील सात ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली गेली आहे. यानंतर त्यांना ७ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं. अन्य आरोपींबाबत देखील लवकरच निर्णय होणार आहे.
आर्यन खानकडून वकील सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली. तर दुसरीकडे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे एनसीबीकडून बाजू मांडली. तर, आर्यन खानच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व धक्कादायक फोटो स्वरूपातील माहिती आढळल्याचे समोर आल्याने, त्याच्या कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली जावी. अशी मागणी यावेळी एनसीबीकडून करण्यात आली होती.
आर्यनच्या फोन चॅटमध्ये बऱ्याच गंभीर स्वरूपातील लिंक आढळून आल्या आहेत, ज्यांचा संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी देखील लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आर्यनने परदेशात असतानाही ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली आहे, त्याच्या चौकशीसाठी आर्यनची कोठडी आवश्यक आहे. असा एनसीबीच्या विकालांनी दावा केला होता. तसेच, अरबाज मर्चंटकडे सहा ग्रॅम चरस आणि मुनमुन धमेच्याकडे पाच ग्रॅम चरस सापडले असल्याचं एनसीबीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. या पार्टीच्या दोन आयोजकांना देखील एनसीबीकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. या दोघांनी आर्यनला कॉम्पिलमेंट्री पास का दिले? त्या आठ जणांचा संबंध काय होता, ज्यांच्याकडे ड्रग्ज सापडले. त्यांनी आणले होते का त्यांना क्रूझवर ड्रग्ज मिळाले ? या सगळ्याची चौकशी करण्यासाठी आर्यनच्या कोठडीत वाढ केली जावी, अशी एनसीबीकडून मागणी करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने एनसीबीच्या बाजूने निर्णय सुनावल्याने पुढील तीन दिवस आर्यनसह अन्य दोन जण हे एनसीबी कोठडीत असणार आहेत.