काँग्रेस नेत्यांची चौकशी ;अशोक चव्हाणांचा आरोप
पंकजा मुंडे, विनोद तावडे, गिरीश बापट, चंद्रशेखर बावनकुळे, बबनराव लोणीकर, डॉ. रणजित पाटील आदी मंत्र्यांवर भ्रष्टाचार वा अनियमिततेचे आरोप झाले असता त्यांना कोणत्याही चौकशीविना भाजप सरकारकडून अभय देण्यात आले. याच वेळी काँग्रेस नेत्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. यावरून भाजपची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते, कोणावर कारवाई होणार याचे सूतोवाच करणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे राजभवन किंवा सीबीआयचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी केला.
‘आदर्श’ घोटाळाप्रकरणी अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला दाखल करण्यास परवानगी मिळावी म्हणून भाजप सरकारने पाऊल उचलले आहे. सीबीआयने राज्यपालांकडे तशी परवानगी मागितली असून, सरकारने तशी शिफारस राजभवनला केली आहे. या पाश्र्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्ला चढविला.