मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त २६ मे रोजी राज्यभर ‘पुण्यतिथी’ साजरी करण्यात येणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी मुंबईत सांगितले. गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामकाजावर त्यांनी जोरदार टीका केली. राज्यातील उद्योग गुजरातला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्राचा -हास हाच गुजरातचा विकास असल्याचा टोला त्यांनी लगावला.
ते म्हणाले, अच्छे दिन आणणार असे गाजर लोकांना दाखवत मोदी सरकारनी लोकांची फसवणूक केली आहे. अडीच कोटी नवी रोजगार निर्मिती करू, असे आश्वासन दिले असताना प्रत्यक्षात पहिल्या वर्षात लाखभरच नवे रोजगार उपलब्ध झाले. हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. शेतकऱयांच्या प्रश्नावरही सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. राज्यात शेतकऱयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना, सरकारतर्फे कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. शेतकरी आणि सामान्यांच्या अपेक्षांवर सरकारने पाणी फेरले आहे.
मोदी सरकार केवळ उद्योगपतींसाठी काम करीत असल्याचा आरोप करून ते म्हणाले, शेतकरी संपला तरी चालेल पण मोजके उद्योगपती जगले पाहिजेत, अशी सरकारची भूमिका आहे. सत्ता मिळवून एक वर्ष होत आले तरी सरकारची धोरणे अजून स्पष्ट झालेली नाहीत. निवडणुकीपूर्वी टोल बंद करण्याचे आश्वासन दिले होते. आता या विषयावरून घुमजाव करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.